अॅक्शन मोडमध्ये ठाकरे सरकार; मंत्रालयातून आता दररोज चालणार कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 10:44 PM2019-12-13T22:44:18+5:302019-12-13T22:44:33+5:30
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी बेधडकपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी बेधडकपणे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस चालणारं मंत्रालयीन काम आता दररोज सुरू राहणार आहे. जवळपास 25 वर्षांनंतर मंत्रालयातील कामकाज दररोज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता आठवड्यातून कधीही येऊन जनतेला आपले प्रश्न आणि व्यथा मंत्र्यांसमोर मांडता येणार आहे.
मुख्यमंत्रिपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर ठाकरे दररोज मंत्रालयात जातीनं उपस्थिती दर्शवतात. त्यांचा हा आदर्श इतर सहाही मंत्र्यांना घ्यावा लागणार असून, त्यांनाही मंत्रालयात दररोज यावं लागणार आहे. तसेच आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी उद्धव ठाकरे मंत्र्यांची एक बैठक बोलावणार असून, त्यात सर्व महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार आहेत. राजकीय दौरे आणि कार्यक्रमांचा अपवाद सोडल्यास उद्धव ठाकरे मंत्रालयात दररोज येणार आहेत.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात मंगळवारची कॅबिनेट बैठक व्हायची. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस मुख्यमंत्री आणि इतर मंत्री मंत्रालयात उपस्थिती दर्शवायचे. त्यामुळे मंत्रालयातील कामकाज संथ गतीनं सुरू असायचे, पण उद्धव ठाकरेंच्या या निर्णयानं मंत्रालयातील कामकाजाला वेग येणार आहे. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आदी माजी मुख्यमंत्री मुंबईतले नसल्यानं त्यांची मंत्रालयात फार ये-जा नसायची. ठरावीक दिवशीच ते मंत्रालयात भेट द्यायचे. पण मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे यांच्या कार्यकाळात मंत्रालय दररोज सुरू असायचं. कारण हे दोन्ही मंत्री मुंबईचे असल्यानं ते मंत्रालयात दररोज हजेरी लावायचे.
दुसरीकडे फडणवीस नागपूरचे असल्याने ते सतत विदर्भाच्या दौऱ्यावर असायचे. त्यामुळे मंत्रालयात फार लोकांची ये-जा नसायची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही मुंबईतल्या मातोश्रीमध्ये वास्तव्य आहे. त्यामुळे तेसुद्धा दररोज मंत्रालयात उपस्थित राहणार असून, मंत्रालयीन कामकाजाला वेग येणार आहे.