राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:04 PM2019-12-10T12:04:27+5:302019-12-10T12:05:00+5:30
कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
नागपूर - राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे तर सर्वाधिक जागा मिळूनही राज्यात भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. मात्र कर्नाटकमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. त्याचे पडसाद राज्यातही उमटताना दिसत आहे.
भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार गिरीश व्यास यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दावा केला आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल. इतकचं नाही तर भाजपाने निवडणुकीची तयारीदेखील केली आहे. त्या निवडणुकीत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांची विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठित खजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. जनतेने भाजपाला नवी ताकद दिली आहे अशा शब्दात नरेंद्र मोदींनी कर्नाटक विजयावर भाष्य केलं होतं.
तर जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
याचदरम्यान, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर अजित पवारांनी हवापाण्याच्या गप्पा झाल्या असं स्पष्टीकरण केले असले तरी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आशावादी असल्याचं दाखवून दिलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा जन्मच मुळात कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झालेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा जन्म सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपायी झाला आहे. महाराष्ट्र आघाडीचा जन्म जनादेशाचा अवमान करत, महाराष्ट्राचा अपमान करत झालेला आहे. तसेच लवकरच गोड बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात ती येऊ शकते असं सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे.