ठाकरे सरकारचा राष्ट्रवादीला दणका ; मुंबई रेडी रेकनर दरात घट तर राज्यात सर्वाधिक वाढ पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 11:04 AM2020-09-12T11:04:28+5:302020-09-12T11:15:40+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 3.91 टक्के वाढ केली आहे
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : राज्यातील महाआघाडी ठाकरे सरकारने आपल्यासोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. राज्याचे रेडी रेकनरचे दर निश्चिती करताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात म्हणजे मुंबईत रेडी रेकनर दरामध्ये 0.6 टक्क्यांनी घट केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल 3.91 टक्के वाढ केली आहे. मुद्रांक शुल्क विभागाने जून महिन्यातच शासनाला प्रस्ताव सादर केला होता. परंतु मुंबईच्या दर निश्चितीसाठी तब्बल दोन महिने राज्याचे रेडी रेकनर दर लांबणीवर पडले.
राज्यात सध्या तीन पक्षाचे सरकार असून, यांचे अनेक चांगले-वाईट गोष्टी सध्या समोर येत आहेत. याचाच एक भाग म्हणजे राज्याचे रेडी रेकनरचे दर निश्चित करताना मोठ्या प्रमाणात गडबड करण्यात आली आहे. सध्या तीन पक्षांकडून राज्याचा विचार करण्यापेक्षा आप-आपले गड कसे शाबूत राहतील व त्यासाठी सरकारमध्ये राहून काय लाभ उठवता येतील याचाच प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे करत असताना एकमेकांवर कुरघोडी करण्याचे करण्यात येत आहे. राज्यात बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे गेल्या दोन वर्षे रेडी रेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. त्यात या वर्षी कोरोना महामारीचे संकट शासनाने केवळ नैसर्गिक नियमानुसार ही दर वाढ करण्यात आली आहे. केवळ हा नैसर्गिक नियम लावताना मुंबई साठी वेगळा आणि पुण्यासाठी वेगळा नियम लावण्यात आला आहे.
---
राज्याच्या इतिहासात प्रथमच मुंबईमध्ये दर घट
राज्याच्या मुद्रांक शुल्क अधिनियमामध्ये रेडी रेकनर दरामध्ये केवळ वाढ अथवा जैसे थे दर ठेवण्याचीच तरतुद होती. परंतु सन 2018 मध्ये या अधिनियमांमध्ये बदल करण्यात आला व खरेदी विक्री व्यवहाराची तपासणी करून गरज असल्यास रेडी रेकनर दरामध्ये घट देखील करू शकतो. गेल्या दोन वर्षांत राज्यात रेडी रेकनर दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही. परंतु यंदा यामध्ये नगण्य बदल करण्यात आले. यामध्ये
राज्यात प्रथमच मुंबई मध्ये दर घट करण्यात आली आहे.
----
पुण्यावर दुहेरी अन्याय ; मुंबईकरांना डब्बल फायदा
राज्य शासनाने मंदी आणि कोरोनाचे संकट या पार्श्वभूमीवर स्टॅम्प ड्युटीमध्ये 3 टक्क्यांची सवलत दिली आहे. शासनाने स्टॅम्प ड्युटीवर सवलत दिल्यानंतर घर खरेदी विक्री व्यवहारामध्ये चांगली वाढ झाली आहे.
परंतु आता रेडी रेकनर दरामध्ये केवळ पुणे जिल्ह्यात 3.91 टक्के वाढ केली आहे. यामुळेच पुण्यात घरांच्या किंमती पुन्हा वाढणार असून, रेन रेकनरचे दर स्टॅम्प ड्युटीच्या सवलती पेक्षा अधिक असल्याने पुण्यावर दुहेरी अन्याय झाला आहे. तर मुंबईकरांना स्टॅम्प ड्युटीवरील सवलत आणि रेडी रेकनर दरामध्ये घट असा डब्बल फायदा होणार आहे.