मोटार वाहन कर कमी होणार? ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:03 AM2021-10-19T10:03:23+5:302021-10-19T10:04:03+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत वाहतूकदार संघटनांच्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत तसे संकेत मिळाले.
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्य शासनाने गेल्या वर्षी मोटार वाहन कर ५० टक्के कमी करून मोठा दिलासा दिला होता. या वर्षीही तशी सवलत देण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत वाहतूकदार संघटनांच्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत तसे संकेत मिळाले.
कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतूकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल, वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, उपाध्यक्ष महेंद्र लुले, सरचिटणीस दयानंद नाटेकर यांनी मागण्या मांडल्या.
जड वाहन्यांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, चेक पोस्टवर वाहनामागे केली जाणारी १९५ रुपयांची वसुली तत्काळ बंद करावी, चेक पोस्टच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारावेत, मोटार वाहन कर आणि व्यवसाय कर एक वर्षासाठी माफ करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसचा कर कमी करावा, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत १० ते १६ तास करण्यात आलेली प्रवेशबंदी उठविणे, कालबाह्य प्रलंबित वाहतूक खटले रद्द करावेत, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करावेत, अशा मागण्याही पदाधिकाऱ्यांनी केल्या.
राज्यातील शहरांमध्ये बस व ट्रक यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील व मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्यास त्यांनी सांगितले.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते.