ठाकरे सरकार अन् अधिवेशनाचे वाकडेच! अडीच वर्षांत केवळ ४३ दिवस अधिवेशन

By यदू जोशी | Published: March 3, 2022 07:40 AM2022-03-03T07:40:25+5:302022-03-03T07:41:25+5:30

ठाकरे सरकारच्या काळात विधिमंडळाची एकूण ९ अधिवेशने झाली असून, विधानसभेत एकूण ४३ दिवसांमध्ये २६०.५४ तास इतके कामकाज झाले.

thackeray government only 43 days of convention in two and a half years | ठाकरे सरकार अन् अधिवेशनाचे वाकडेच! अडीच वर्षांत केवळ ४३ दिवस अधिवेशन

ठाकरे सरकार अन् अधिवेशनाचे वाकडेच! अडीच वर्षांत केवळ ४३ दिवस अधिवेशन

Next

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना महामारीचा फटका बसल्याने उद्धव ठाकरे सरकारमधील विधिमंडळाची अधिवेशने आक्रसली. फार कमी दिवसांची अधिवेशने घ्यावी लागली. गुरुवारपासून सुरू होत असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ मार्चपर्यंत चालले, तर ते या सरकारच्या कार्यकाळातील सर्वात जास्त कालावधीचे अधिवेशन असेल. 

या सरकारच्या काळात विधिमंडळाची एकूण ९ अधिवेशने झाली. त्यात विधानसभेत एकूण ४३ दिवसांमध्ये २६०.५४ तास इतके कामकाज झाले. विधानपरिषदेच्या ४३ दिवसांच्या अधिवेशनात २३९ तासच कामकाज झाले.  सर्वाधिक कामकाज २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाले. ठाकरे सरकारमध्ये पहिले अधिवेशन मुंबईत झाले. नंतर १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९ असे केवळ पाच दिवसांचे नागपूर अधिवेशन झाले. तेव्हा कोरोना महामारी आलेली नव्हती, पण सरकार नवे होते. नागपूरचे अधिवेशन किमान दोन ते तीन आठवडे चालते. पण ते पाचच दिवस चालले. त्यात विधानसभेत ४७ तास २९ मिनिटांचे कामकाज झाले.

दोन अधिवेशनांना नागपूर मुकले 

- मंत्री उपस्थित नसल्याने २० मिनिटांचे कामकाज वाया गेले. अन्य कारणांमुळे २ तास ३५ मिनिटे कामकाज होऊ शकले नव्हते. 

- दररोज सरासरी आठ तास कामकाज झाले. त्यानंतर एकही अधिवेशन नागपुरात झाले नाही. दोन अधिवेशनांना नागपूर मुकले. 

- प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, अर्धा तासाच्या चर्चा यातून अनेक प्रश्नांना न्याय मिळतो. त्यांचाही या अधिवेशनांमध्ये संकोच झाला. शेकडो प्रश्न अनुत्तरित राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात येऊ शकले नव्हते.

विधानसभा अधिवेशन    कालावधी    ठिकाण    दिवस    तास


पहिले अधिवेशन    २७ नोव्हें ते १ डिसें २०१९    मुंबई    ०३    ९.२८ 
हिवाळी अधिवेशन    १६ ते २१ डिसें २०१९    नागपूर    ०६    ३०.१२ 
एक दिवसाचे अधिवेशन    ८ जाने २०२०    मुंबई    ०१    १.१७ 
अर्थसंकल्पीय अधिवेशन    २४ फेब्रु ते १४ मार्च २०२०    मुंबई    १४    ९२.०७ 
पावसाळी अधिवेशन    ७ आणि ८ सप्टें २०२०    मुंबई    ०२    ९.३० 
हिवाळी अधिवेशन    १४ आणि १५ डिसें २०२०    मुंबई    ०२    १५ 
अर्थसंकल्पीय अधिवेशन    १ ते १० मार्च २०२१    मुंबई    ०८    ४७ 
पावसाळी अधिवेशन    ५ आणि ६ जुलै २०२१    मुंबई    ०२    १०.१० 
हिवाळी अधिवेशन    २२ ते २८ डिसें २०२१    मुंबई    ०५    ४६.५०    

विधानपरिषद अधिवेशन    कालावधी    ठिकाण    दिवस    तास


पहिले अधिवेशन    १ डिसें २०१९    मुंबई    ०१    .५३ 
हिवाळी अधिवेशन    १६ ते २१ डिसें    नागपूर    ०६    ३४.३९ 
एक दिवसाचे अधिवेशन    ८ जानेवारी    मुंबई    ०१    ०.५१ 
अर्थसंकल्पीय अधिवेशन    २४ फेब्रु ते १४ मार्च २०२०    मुंबई    १४    ८३.३० 
पावसाळी अधिवेशन    ७ आणि ८ सप्टें २०२०    मुंबई    ०२    १०.५४ 
हिवाळी अधिवेशन    १४ आणि १५ डिसें २०२०    मुंबई    ०२    १०.२५ 
अर्थसंकल्पीय अधिवेशन    १ मार्च ते १० मार्च २०२१    मुंबई    १०    ५१.१० 
पावसाळी अधिवेशन    ५ आणि ६ जुलै २०२१    मुंबई    ०२    ६.३० 
हिवाळी अधिवेशन    २२ ते २८ डिसें २०२१    मुंबई    ०५    ४२.४८

Web Title: thackeray government only 43 days of convention in two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.