" ठाकरे सरकार म्हणजे 'पलटूराम' सरकार; बदल्या करा अन् माल कमवा हेच त्यांचे धोरण .."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 02:23 PM2020-11-25T14:23:21+5:302020-11-25T18:15:26+5:30
राज्य सरकार रोज नवी घोषणा करते आणि ती लगेच मागे घेते: देवेंद्र फडणवीस
पिंपरी: राज्य सरकार रोज घोषणा करते आणि मागे घेते. पलटूराम सरकार आहे. वर्षभर बदल्या करा, आणि माल कमवा, हे धोरण अवलंबले आहे. सगळीकडे बदल्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे, अशी टीका भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे केली.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी चिंचवड येथे मेळावा झाला. त्यावेळी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, निरंजन डावखरे, महापौर उषा ढोरे, महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, संग्राम देशमुख आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''अनैसर्गिक सरकार निर्माण केले. त्याचे परिणाम आपण पाहत आहात.
फडणवीस म्हणाले, ''2002 चा अपवाद वगळता पुणे हा पदवीधर मतदार संघ भाजपचा गड होता. तो राखायचा आहे. कोविडचे आव्हान देशासमोर उभे राहिले असताना, राजकीय पक्ष पंतप्रधान मोदी याना नावे ठेवायचे. मात्र, पंतप्रधान सामान्य माणसांची यांची चिंता करीत होते. आत्मनिर्भर भारत सुकर जीवन केले. राज्य सरकार केवळ बोलघेवडे आहे. महाराष्ट्र सरकारने कोणालाही मदत केली नाही. समृद्ध राज्याने तुम्ही तूमच्या, आम्ही आमच्या घरी सुखरूप रहा एवढेच सांगितले. ही दुर्दैवी बाब आहे. मदत करायची सोडून न वापरलेल्या विजेचे भरमसाठ बिल दिले. दोन खोल्यासाठी २० हजार बिल आले होते. वीज वापरलीच नाही तर बिल का भरावे. जी बिले वाढीव आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हे राज्य सरकार रोज नवी घोषणा करीत आहे आणि मागे घेत आहे. पलटूराम सरकार आहे. ''
........
विकास बंद पडण्याचे काम फडणवीस म्हणाले, ''वर्षभरात सरकारने काय केले तर सुरू असणारे प्रकल्प आणि काम बंद पाडली. आणि बदल्या करा माल कमवा, हे धोरण स्वीकारले. बदल्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांत असंतोष पसरत आहे. महाराष्ट्र असंतोष मतात परावर्तीत करायला हवा. विजेचा शॉक दिला त्यांना मतांचा शॉक द्यावा.'' अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले.