किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘पोलखोल प्लॅन’; भाजपा अडचणीत येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:29 PM2021-09-23T12:29:53+5:302021-09-23T12:34:03+5:30
मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा टाकला आहे. तर कितीही दावे दाखल करा तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून दिलं जात आहे.
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यासह सरकारमधील विविध मंत्र्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. किरीट सोमय्यांच्या या आरोपामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरु आहे. मंत्री हसन मुश्रीफ, अनिल परब यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप लावले जात आहेत. मंत्र्यांकडून या आरोपाचं खंडन केले जात आहे.
मंत्री अनिल परब(Anil Parab) यांनी किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांच्यावर उच्च न्यायालयात १०० कोटींचा मानहानीचा दावा टाकला आहे. तर कितीही दावे दाखल करा तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणारच असं प्रतिआव्हान भाजपा नेते किरीट सोमय्यांकडून दिलं जात आहे. सोमय्यांच्या यांच्या आरोपावर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी दखल घेत भाजपाला जशास तसं उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी मागील फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची माहिती ठाकरे सरकार बाहेर काढणार असल्याची माहिती आहे. ABP नं असं वृत्त दिलं आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपा सरकार काळातील घोटाळे बाहेर आणण्यासाठी पोलखोल प्लॅन आखण्यात आला आहे. त्यासाठी विशेष समिती तयार केल्याची माहिती आहे. आगामी काळात भाजपाच्या माजी मंत्र्यांची विविध प्रकरणं बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपाला भाजपा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
काय आहे प्रकरण?
राज्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कोल्हापूरच्या मातीत येऊन शड्डू ठोकणार होते; परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना भल्या सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून कराड येथे उतरविले आणि त्यानंतर दिवसभर नेतेमंडळींच्या आरोपांच्या फैरी झडल्या. कोल्हापूरला जाऊ न दिल्याने सोमय्या यांनी कराडमध्येच पत्रकार परिषद घेतली आणि थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाच लक्ष्य केले होते. ठाकरे कुटुंबीयांच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याची माहिती घेण्यासाठी आणि बेनामी मालमत्तेचा हिशेब करण्यासाठी लवकरच अलिबागला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे याच्या माध्यमातून, माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप सोमय्या यांनी येथे केला होता.