“CM शिंदेंना शिवरायांप्रती आत्मियता असेल तर ४ प्रश्नांची उत्तरे देतील”; ठाकरे गटाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:38 PM2024-08-30T16:38:08+5:302024-08-30T16:40:58+5:30

Shivaji Maharaj Statue Collapse Issue: आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो, म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात एक समिती नेमली, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

thackeray group ambadas danve asked questions to cm eknath shinde over shivaji maharaj statue collapsed issue | “CM शिंदेंना शिवरायांप्रती आत्मियता असेल तर ४ प्रश्नांची उत्तरे देतील”; ठाकरे गटाचे आव्हान

“CM शिंदेंना शिवरायांप्रती आत्मियता असेल तर ४ प्रश्नांची उत्तरे देतील”; ठाकरे गटाचे आव्हान

Shivaji Maharaj Statue Collapse Issue: सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करत आहेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. यातच आता पुन्हा एकदा ठाकरे गटाने या मुद्द्यावरून महायुतीवर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान दिले आहे. 

राजकोट येथे ठाकरे गट आणि भाजपा राणे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्यानंतर या प्रकरणी अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. यातच आता ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही प्रश्न केले आहेत. 

CM शिंदेंना शिवरायांप्रती आत्मियता असेल तर ४ प्रश्नांची उत्तरे देतील

आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो, म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात एक समिती नेमली. हा विषय महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला असल्याने काही विषय मांडतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून असतील तर यावर उत्तर देतील. वास्तूविशारद आणि शिल्पकार या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्या लोकांचे नाव या समितीमध्ये घेतले आहे, त्या लोकांनी कधी साधा मातीचा गणपती तरी हाताने बनवला आहे का? ते पडलेल्या शिल्पाचा अभ्यास करण्यास पात्र आहेत का? किती उंचीचा पुतळा येथे उभारायचा, याचा शास्त्रीय अभ्यास झाला होता का? खालील बेटाची ताकद जोखून हा पडलेला पुतळा उभा झाला होता का? की कोणाची तरी राजकीय महत्वाकांक्षा म्हणून मनाने उंचीचा आकडा सांगितला गेला? राजकोटवर आजघडीला उपलब्ध बांधकाम सामुग्री वापरून उभारण्यात आलेली लाल भडक तटबंदी किल्ल्याच्या मूळ अवशेषांचे वाटोळे करून उभारली गेली का? विद्यमान सदस्यांच्या प्रेमापोटी काही विद्वान माणसे मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली आहेत का? असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.

दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा पुतळा आम्ही पाहिला होता. बांधकाम बघितले होते ते काही चांगल्या गुणवत्तेचे नव्हते हाच महाराजांचा अपमान आहे. मात्र हा पुतळा का पडला, त्यामागची कारणे काय हे बाजूला पडले आणि त्यात राजकारण सुरू झाले, अशा भावना मालवणमधील स्थानिकांनी व्यक्त करण्यात आल्या आहेत.
 

Web Title: thackeray group ambadas danve asked questions to cm eknath shinde over shivaji maharaj statue collapsed issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.