Maharashtra Politics: “अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारला जड जाणार”; ठाकरे गटातील नेत्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 05:52 PM2023-02-26T17:52:44+5:302023-02-26T17:53:30+5:30
Maharashtra News: घटनाबाह्य सरकारचे चहापाण्याचे निमंत्रण स्वीकारले असते तर महाराष्ट्र द्रोह ठरला असता, असे सांगत ठाकरे गटातील नेत्याने सरकारवर टीका केली.
Maharashtra Politics: एकीकडे राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यातच शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन शिंदे-फडणवीस सरकारला जड जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
घटनाबाह्य पद्धतीने सत्ता स्थापन करून सत्तेत बसलेल्या सरकारचे चहापाण्याचे निमंत्रण स्वीकारले असते तर महाराष्ट्र द्रोह ठरला असता व जनतेशी प्रतारणा ठरली असती म्हणून सरकारकडून निमंत्रण दिलेल्या चहापाणी कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार घातला असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
सरवणकर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही
गेल्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबारप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेले काडतुस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदूकीतील असल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे. तरीही दोषी असलेल्या सरवणकर यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. एकप्रकारे सरकार दोषींना पाठीशी घालत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पगार व इतर मागण्यांसाठी आंदोलन केली गेली, मात्र आजही तिच स्थिती आहे. न्यायालयाने आदेश देऊनही व कर्मचाऱ्यांनी आंदोलन करूनही एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होत नाही, या शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, संभाजीनगर व धाराशिव नामांतराचा सुधारित आदेश केंद्राने काढावा, अशी मागणी करताना, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव न देता सरकार ऑस्ट्रेलियामधून कापूस आयात करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे, असा दावा दानवे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"