“दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील”; राज ठाकरेंची दिल्लीवारी, ठाकरे गटाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 09:07 AM2024-03-19T09:07:48+5:302024-03-19T09:08:51+5:30

Thackeray Group Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: राज ठाकरेंची दिल्लीवारीवरून ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे.

thackeray group ambadas danve reaction on mns chief raj thackeray visit delhi | “दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील”; राज ठाकरेंची दिल्लीवारी, ठाकरे गटाची टीका

“दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील”; राज ठाकरेंची दिल्लीवारी, ठाकरे गटाची टीका

Thackeray Group Reaction on MNS Chief Raj Thackeray Visit Delhi: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाबाबत प्रकाश आंबेडकर यांना अल्टिमेटम दिल्याचा दावा केला जात असून, दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चार दिवसांतील दुसऱ्या दिल्लीवारीमुळे त्यांच्या महायुतीमधील सहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.

चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता राज ठाकरे हे त्यांचे पुत्र अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले. अमित शाह यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेल ताज मानसिंह येथे ते उतरले आहेत. राज-शाह बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील

मीडियाशी बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. दिल्लीच्या बादशाहच्या पाया पडायला गेले असतील. राज ठाकरे भाजपासोबत जातील, असे होऊ शकत नाही आणि गेले तर काहीतरी देतील, एखादा तुकडा टाकतील, या शब्दांत अंबादास दानवे यांनी हल्लाबोल केला. राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, अजून काय घडतेय ते पाहू. ते आताच गेले आहेत. नंतर यावर बोलू, असे दानवेंनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि महायुतीमधील सहभागाच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. राज ठाकरे आणि आमची विचारधारा एकच आहे. एकाच विचाराचे आम्ही सगळे आहोत. त्यामुळे निश्चितपणे योग्य निर्णय होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: thackeray group ambadas danve reaction on mns chief raj thackeray visit delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.