“निकाल आमच्या बाजूने लागेल, देशाची लोकशाही अबाधित ठेवणारा निर्णय असेल”; ठाकरे गटाला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:39 PM2023-05-10T17:39:01+5:302023-05-10T17:39:43+5:30
Maharashtra Politics: न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी निकाल येऊ शकतो. भारताचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी याबाबत संकते दिले आहेत. यावरून आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी खात्री आहे. देशाची लोकशाही अबाधित ठेवणारा हा निर्णय असेल, असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयातील निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वास शिंदे गट तसेच ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच या प्रकरणाच्या प्रक्रियेचा भाग असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी याबाबत भाष्य केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल. हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे. या निर्णयाची संपूर्ण जग वाट पाहत आहे. याची उत्सुकता प्रत्येकाला आहे. सत्तासंघर्षाच्या प्रत्येक सुनावणीला हजर होतो. या निकालावेळीही दिल्लीत असेन. जी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी मी पार पाडेन. सर्वोच्च न्यायालय भारतीय संविधानाला धरून आणि भारताची लोकशाही समृद्ध करणारा निकाल देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. संविधानात ज्या तरतूदी आहेत. त्या तरतुदींप्रमाणेच निर्णय ते देतील, अशी खात्री आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू, असे अनिल देसाई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आधी निकाल येऊ दया मगच सर्वांनी आपले ज्ञान पाजळावे. सर्व जण सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काही चुकीचे केलेले नाही. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असे शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.