Maharashtra Politics: “शिवसैनिकांना सांगा सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:14 PM2023-02-22T21:14:51+5:302023-02-22T21:15:43+5:30
Maharashtra News: रत्नागिरीतील खेड येथे उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाचा निर्णय शिंदे गटाच्या बाजून दिला. यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. दुसरीकडे १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जोरदार कायद्यातील तरतुदी आणि तथ्यांविषयी काथ्याकूट सुरू आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ५ मार्चला खेड येथे सभा घेणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरे हे सभा घेणार आहे. त्याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात इतर राजकीय पक्षांचे नेतेही प्रवेश करणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. यातच या सभेबाबत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आदेश दिले आहेत.
शिवसैनिकांना सांगा सभा विराट झाली पाहिजे
एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतांना दुसरीकडे निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह यावर निर्णय दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत असल्याचे सांगितले जात आहे. मातोश्रीबाहेर कोकणातील शिवसैनिक जमले होते. त्यांना उद्देशून बोलताना, सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर दौरा करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाप्रमुख यांच्यासह महानगरप्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या सभेत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यभर दौरा करण्याचा निर्णय घेत असतांना सुरुवात कोकणातून करण्यात आली आहे. त्याची तयारी शिवसैनिकांनी सुरू केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"