तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 20:36 IST2025-04-15T20:33:49+5:302025-04-15T20:36:21+5:30
Shiv Sena Uddhav Thackeray Group News: १६ एप्रिलला उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असून, निर्धार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला
Shiv Sena Uddhav Thackeray Group News: लोकसभा निवडणुकीतील विजय आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर जात आहेत. यासंदर्भातील एक टिझर संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. नेते, पदाधिकारी यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे.
बुधवार, १६ एप्रिल २०२५ रोजी उद्धव ठाकरे यांचे निर्धार शिबीर नाशिक येथे होत आहे. यासंदर्भातील एक टिझर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या या टिझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप समाविष्ट करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची ऑडिओ क्लिप
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो... जय महाराष्ट्र. आज तुफान गर्दी दिसत आहे. अरे, नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचे नाते आहेच आणि ते राहणारच. कमळाबाई म्हणजे ढोंग आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय, देशात कोणी ओळखत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. सगळा पैशांचा खेळ. आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील, तर ते हेच भाजपावाले. हिंदुत्व ही तुमची काही खासगी मालमत्ता नाही. आणि हिंदू, हिंदूमध्ये भांडणे लावली जात आहेत. जाती, पोटजातीत मारामाऱ्या लावून मजा पाहत आहेत. पण एक गोष्ट ठासून सांगतो, तुमचे शंभर बाप खाली उतरले, तरी शिवसेनेचे अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही, अशी विधाने असलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ऑडिओ क्लिप या टिझरमध्ये दाखवण्यात आली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनोहर गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात उद्धव ठाकरे शहर-जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधत मार्गदर्शन करणार आहेत.
Nashik Nirdhar shibir
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 15, 2025
Shivsena pramukh Hon.Balasaheb sanvad
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/OKqkCErKUy