“मी जर पंतप्रधान झालो, तर...”; उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितली ‘मन की बात’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 01:19 PM2023-07-10T13:19:24+5:302023-07-10T13:21:34+5:30

Uddhav Thackeray News: भावी प्रधानमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकवण्यात आले, यावर उद्धव ठाकरेंनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

thackeray group chief uddhav thackeray reaction over future prime minister banner | “मी जर पंतप्रधान झालो, तर...”; उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितली ‘मन की बात’

“मी जर पंतप्रधान झालो, तर...”; उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितली ‘मन की बात’

googlenewsNext

Uddhav Thackeray News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर करत सभाही घेतली. यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेही विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी मीडियाशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेकविध विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. 

देशात विरोधी पक्षांची एकजूट सुरू आहे. खरे तर मी त्यांना विरोधी पक्ष मानण्यास तयार नाही. ही देशप्रेमी लोकांची एकता आहे. त्याला सरकार घाबरलेले आहे. पूर्वी सरकार मतपेटीतून तयार व्हायचे, आता खोक्यातून व्हायला लागले आहे. कुणीही दमदाटी करून पक्ष चोरण्याचा प्रयत्न करतो. हा पायंडा आता पडला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जनतेला ‘राईट टू रिकॉल’चा अधिकार मिळाला पाहिजे, असे माझे मत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्ताने भावी प्रधानमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकत आहेत, त्यामुळे तुम्ही प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. 

मी जर पंतप्रधान झालो, तर...

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी स्वतः मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हतो, मी पंतप्रधान झालो, तर काय फरक पडणार आहे. माझ्यासमोर प्रश्न आहे, तो देशाचे स्वातंत्र्य टिकविण्याचा. देशात आणीबाणीनंतर विरोधी पक्षांना बोलण्याची संधी तरी दिली गेली होती. जनता पक्ष आणि अनेक समविचारी नेते मैदानात उतरले होते, आता तीदेखील मुभा राहिलेली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विद्यमान सरकारला नपुंसक सरकार, असे संबोधले होते, आता ते सरकारमध्ये का गेले, असे विचारले असता, मला माहित नाही, ते तिकडे का गेले, कदाचित ताकद वाढवायला गेले असतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.


 

Web Title: thackeray group chief uddhav thackeray reaction over future prime minister banner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.