हीच ती वेळ! उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत महाएल्गार, रामलीला मैदानावर निर्धार सभा; पहिला टीझर आला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 08:55 AM2023-08-25T08:55:18+5:302023-08-25T08:58:53+5:30

Shiv Sena Thackeray Group News: हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे, असे आवाहन करण्यात आले आहे.

thackeray group chief uddhav thackeray will address nirdhar sabha at ramlila maidan in hingoli on sunday 27 august 2023 | हीच ती वेळ! उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत महाएल्गार, रामलीला मैदानावर निर्धार सभा; पहिला टीझर आला

हीच ती वेळ! उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत महाएल्गार, रामलीला मैदानावर निर्धार सभा; पहिला टीझर आला

Shiv Sena Thackeray Group News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे मातोश्रीवर राज्याच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. अनेकविध मतदारसंघाचे आढावे घेतले जात आहेत. यातच उद्धव ठाकरेहिंगोली दौऱ्यावर जाणार असून, येथील रामलीला मैदानावर निर्धार सभेला संबोधित करणार आहेत. या सभेपूर्वी एक टीझर जारी करण्यात आला आहे. 

रविवार, २७ ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे हिंगोलीतील रामलीला मैदानावर निर्धार सभेला संबोधित करणार आहेत. हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंगार या भूमीत १९८५ मध्येच पेरला गेला. शिवसेनेची शाखा स्थापन झाली. त्यानंतर हिंदुत्वाच्या विचारांचा वणवाच पेटला. गाव तिथे शाखा सुरू झाल्या. हिंगोलीने विधानसभा, लोकसभेवर शिवसेनेचे शिलेदार पाठवले. दुर्दैवाने निष्ठेला गद्दारीची दृष्ट लागली. हीच गद्दारीची विषवल्ली कायमची उखडून फेकण्यासाठी शिवसेनेचा महाएल्गार रामलीला मैदानावर होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

याच लढाईची आम्ही वाट बघत होतो

रविवारी होणाऱ्या निर्धार सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी हिंगोलीसह संपूर्ण मराठवाडा पिंजून काढला आहे. हिंगोली येथे रविवारी होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिला टिझर आला आहे. तेच तेज, तेच सळसळतं रक्त, निष्ठावंतांचा जनसागर. छंद आमचा जुना, नसानसातं शिवसेना. निकराने लढू, गड उभारू पुन्हा. शिवसेना संपवण्यासाठी चोहोबाजूने गारदी तुटून पडत आहेत. पण याच लढाईची आम्ही वाट बघत होतो. एकतर कुणाच्या पाठीत वार करायचा नाही, जर कुणी वार केला तर त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहायचे नाही, असे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

"हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला
मोठ्या संख्येनं उपस्थित रहायचं!"

निर्धार सभा

प्रमुख मार्गदर्शकः मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख

रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी, दुपारी २ वाजता.
रामलीला मैदान, हिंगोली. pic.twitter.com/WqHJlfcj62— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 24, 2023

दरम्यान, शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे. मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. पण माझ्या नितिमत्तेत बसत नव्हते. २०१४ पासून ज्यांनी फसवले त्यांच्यासोबत कसे जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले त्यांना डांबून काय करणार होतो? त्यांना मी काय कमी केले होते? स्वाभिमान महत्त्वाचा होता. शिवसेनेचा दरारा कायम राखणे महत्त्वाचे होते. त्यामुळे मी कोणतीही तडजोड केली नाही. मी भाजपसोबत गेलो नाही, असे उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटल्याचे बोलले जात आहे. 

 

Web Title: thackeray group chief uddhav thackeray will address nirdhar sabha at ramlila maidan in hingoli on sunday 27 august 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.