शिंदे-ठाकरे गटात अटीतटीची लढत; रत्नागिरीतील तीन ग्रामंपचायतींवर ठाकरे गटाचे वर्चस्व
By अरुण आडिवरेकर | Published: October 17, 2022 03:36 PM2022-10-17T15:36:24+5:302022-10-17T18:50:26+5:30
तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती.
रत्नागिरी : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली हाेती. तीनही ठिकाणी मंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाेती. त्यामुळे तालुक्यात शिंदे गट वर्चस्व राखणार की, उद्धव ठाकरे गट याची उत्सुकता हाेती. या निवडणुकांमध्ये शिरगाव, पाेमेंडी बुद्रुक आणि फणसाेप ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या सरपंच विराजमान झाल्या आहेत.
तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायत प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. याठिकाणी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी ताकद लावली हाेती. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले हाेते. याठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली.
महाविकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी ३०० मतांनी विजयी झाल्या. त्यांना २ हजार ६० मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार माेरे यांना १७०० आणि कुमठेकर यांना १७५० मते मिळाली. मात्र, ग्रामपंचायतीत १७ पैकी १५ जागा जिंकत शिंदे गटाने वर्चस्व राखले.
पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीतही उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ममता जोशी यांना १ हजार १६० तर शिंदे गटाच्या बारगुडे यांना ८९२ मते पडली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील जोशी या २६८ मतांनी विजयी झाल्या.
फणसोप ग्रामपंचायतीवरही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बाजी मारली. सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या राधिका साळवी विजयी झाल्या. त्यांना १ हजार ४०० मते मिळाली तर शिंदे गटाच्या शेलार यांना १ हजार ३६ मते मिळाली.
राधिका साळवी या ३६४
मतांनी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीच्या ११ पैकी १० जागा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे राहिल्या तर केवळ १ जागा शिंदे गटाकडे राहिली आहे.