“भाजपामध्ये सत्य वेगळे अन् बाहेर दाखवतात दुसरेच, ठाकरे गटात आलो कारण...”: करण पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 11:18 AM2024-04-12T11:18:34+5:302024-04-12T11:19:22+5:30
Karan Pawar News: भाजपकडे सत्ता, पैसा, यंत्रणा असल्याने ते काहीही बोलू शकतात. कोणालाही काही म्हणतात, अशी टीका करण पवारांनी केली.
Karan Pawar News: भाजपामध्ये असताना आत सत्य वेगळे असायचे आणि बाहेर सोईनुसार वेगळे दाखविले जायचे. म्हणूनच आपण भाजपा सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडे आलो आहे. भाजपकडे सत्ता, पैसा, यंत्रणा असल्याने ते काहीही बोलू शकतात. कोणालाही काही म्हणत आहेत. सत्ता असल्याने आव्हान मोठे आहे पण जनतेच्या दरबारात न्याय मिळेल अशी आशा आहे, असे ठाकरे गटात सामील झालेल्या करण पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभेसाठी पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. करण पवार यांना उमेदवारी देऊन ठाकरे गटाने भाजपला धक्का दिला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटील विक्रमी मताधिक्याने जळगावातून निवडून आले होते. करण पवार हे उन्मेष पाटील यांचे जवळचे मित्र आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले उन्मेष पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला.
जनतेतून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे
सत्ता असल्याने पैसा, दबाव तंत्र, यंत्रणा आहे. मोठे लोक असल्याने ते कोणालाही काहीही म्हणू शकतात. मात्र विरोधात गेलो असल्याने विरोध होईल हे अपेक्षित असताना आपण विरोधकांच्या भूमिकेत उद्धव ठाकरे गटाकडे आलो. जनतेतून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा अनुभव येत आहे, असे करण पवार म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना उमेदवार करण पवार यांनी भाजपावर टीका केली.