“संभ्रम निर्माण होतोय”; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाचे नेते स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 01:00 PM2023-08-25T13:00:51+5:302023-08-25T13:04:29+5:30
Maharashtra Politics: शरद पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
Maharashtra Politics: अजित पवार हे आमचेचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विशेष करून महाविकास आघाडीतील नेते यावर सावध पवित्रा घेऊन भाष्य करताना दिसत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केले असावे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. पण शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय. मला जाहीरपणे काही वक्तव्य करता येणार नाही.मात्र आमच्यामध्ये, शिवसेनेत संभ्रम निर्माण होतो. स्पष्ट भूमिका समोर यायला पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते. जे लोक राष्ट्रवादीत गद्दारी करुन भाजपसोबत जातात आणि हे त्यांना नेता मानतात, असे अंबादास दानवेंनी म्हटले आहे. ते मीडियाशी बोलत होते.
शरद पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही
इंडिया आघाडी काही फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेनेपुरती मर्यादित नसून देशपातळीवर आहे. शरद पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो. आम्ही आमची भूमिका अमच्या पक्ष प्रमुखाकडे सातत्याने मांडल्या आहेत. राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत आम्ही पक्षप्रमुखाकडे विचार मांडत असतो, असे अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच राज्यातील ४० लोकसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. त्यामुळे आमची मोदींना डोकेदुखी होणार आहे. मोदींना आमचा धसका घेतला आहे. मध्य प्रदेशात सिंधिया यांचे जे हाल झाले तसेच हाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रात होतील, असा दावा अंबादास दानवेंनी केला.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आढावा घेत आहे. शिवसेनेची स्थिती काय? कोण उमेदवार? याचा आढावा घेतला जात आहे. २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.