“मी एकनिष्ठ शिवसैनिक, राजू शिंदेसाठी २५०० लोकांना फोन केले, १ लाख मते...”; खैरेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:15 IST2025-04-02T15:10:57+5:302025-04-02T15:15:52+5:30
Thackeray Group Chandrakant Khaire News: विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करताना चंद्रकांत खैरे यांच्याबाबत उघडपणे नाराजी बोलून दाखवली.

“मी एकनिष्ठ शिवसैनिक, राजू शिंदेसाठी २५०० लोकांना फोन केले, १ लाख मते...”; खैरेंचा पलटवार
Thackeray Group Chandrakant Khaire News: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात पक्षात प्रवेश केलेल्या राजू शिंदे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. आता अखेर त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सोपवला. विशेष म्हणजे, राजू शिंदे यांनी आपल्या राजीनामा पत्रात माजी खासदार चंद्रकांत खैरेंवरची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आणि आपल्या समर्थकांसह पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजू शिंदे यांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला चंद्रकांत खैरे यांनी उत्तर दिले.
उद्धव ठाकरे आणि अबांदास दानवे यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्षात प्रवेश केला होता. आपण ही माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी व सहकारी आपले आभारी आहोत. परंतु मी काही कारणास्तव तसेच माजाी खासदार चंद्रकांत खैर साहेब यांच्या बद्दल माझी नाराजी असून मी व माझे सर्व समर्थक, सहकारी यांच्या सह शिवसेना पक्षाचा आणि विधानसभा प्रमुख या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो स्वीकारावा, असे राजू शिंदे यांनी म्हटले होते.
मी एकनिष्ठ शिवसैनिक, राजू शिंदेसाठी २५०० लोकांना फोन केले, १ लाख मते...
माझ्यावर कुणी आरोप करत नाही. मात्र एका व्यक्तीने राजीनामा दिला. ती व्यक्ती मनपामध्ये शिवसेनेला त्रास देत होती. योजना होऊ द्यायचे नाही हे त्यांचे धोरण आहे. चिकलठाणा येथे ब्लॅकमेल करण्याचे काम करतो. माझ्या निवडणुकीत विरोधात काम केले. आमच्या एका नेत्याने त्याला आणला, तिकीट मिळवून दिले. पक्षाचा आदेश असल्याने मी त्याच काम केले. पराभव झाल्यानंतर तो दिसला नाही. त्याने काही जाहिराती दिल्या. त्यात एकट्या व्यक्तीचा फोटो होता. त्याने पक्ष डिस्टर्ब केला. त्याच्याबद्दल बोलून मी त्याला मोठे करणार नाही. तो येतो जातो असे त्याच काम आहे. मागच्या वेळी ४२ हजार मते मिळाली. यावेळी शिवसेनेमुळे मतांचा आकडा १ लाखांवर गेला. आहेत. राजू शिंदेसाठी निवडणुकीत मी २५०० लोकांना फोन केले. असे असताना माझ्यावर आरोप करत आहे. मी मात्र एकनिष्ठ शिवसैनिक आहे. काही कारणास्तव असे म्हणतो, तर नेमके काय कारण आहे ते सांगावे, या शब्दांत खैरे यांनी पलटवार केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, राजू शिंदे यांनी ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे उमेदवार आणि मंत्री संजय शिरसाट यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेली होती. विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांना १ लाख ६ हजार १४७ मते मिळाली होती. तर, संजय शिरसाट यांना १ लाख २२ हजार ४९८ मते मिळाली होती. दरम्यान, राजू शिंदे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. पण, अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.