“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 05:34 PM2024-09-15T17:34:10+5:302024-09-15T17:35:53+5:30
Shiv Sena Thackeray Group News: लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महिन्यात जनता घरी बसवणार होती. परंतु, दोन कुबड्या घेऊन ते उभे राहिले, अशी टीका ठाकरे गटाने केली.
Shiv Sena Thackeray Group News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या बैठका, दौरे, सभा यांना वेग येताना पाहायला मिळत आहे. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचे मुद्देही अधिक तापताना दिसत आहेत. यातच उद्धव ठाकरे शिर्डी, छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या महाअधिवेशनाला उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी ठाकरे गटातील नेत्यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
मला सत्तेची पर्वा नाही. मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे. मला तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे. सत्ता येत असते आणि सत्ता जात असते. गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे. गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आणि सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, एक लक्षात घ्या, एकजूट महत्त्वाची आहे. जे फोडाफोडीचे राजकारण शिवसेनेबरोबर करण्यात आले. हे जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्यांबरोबर करतील. हे सरकार गेल्यात जमा आहे. खरे तर महायुतीच्या नेत्यांना सत्तेशिवाय उपाशी ठेवले पाहिजे, असा निर्धार करायला हवा, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी एल्गार केला. यातच ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी त्यांना स्वतःला किती पेन्शन मिळते, हे सांगत मे महिन्यात नरेंद्र मोदी घरी बसले असते तर त्यांना किती पेन्शन मिळाले असते, हेही सांगून टाकले.
आमदार , खासदार , मंत्री सर्वांनाच पेन्शन मिळते
पेन्शन सर्वांना मिळते. कर्मचाऱ्यांना मिळते एवढेच नाही. लोकप्रतिनीधींनाही पेंशन मिळते. मी २२ वर्ष आमदार होतो. पहिल्या वेळेला बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला आणि विधानसभेत पाठवले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पुन्हा पुन्हा संधी दिली. या २२ वर्षात सेवा केली. लोकप्रतिनिधी असताना ती सेवा आहे, असे सगळेच लोक मानत नाहीत, पण आपण तसे मानुया. त्यामुळे मला पेन्शन सुरू झाली. मला ८४ हजार रुपये पेन्शन मिळते. पेन्शन हा प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येक सरकारी कर्मचारी पूर्ण आयुष्य सेवेत घालवतो. रिटायरमेंट नंतर कुटुंबावर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येवू नये अशी भावना असते. आमदार , खासदार , मंत्री सर्वांनाच पेन्शन मिळते, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सर्वच आता घरी बसणार आहेत. त्यांना ९० हजार पेन्शन मिळणार आहे. लाडक्या पंतप्रधानांना मागे मे महिन्यात जनता घरी बसवणार होती. परंतु, दोन कुबड्या घेऊन ते उभे राहिले. ते आता पदावर नसते, तर त्यांना ९० हजार रुपये मिळणार असते, असा दावा सुभाष देसाई यांनी केला.