खबरदार! यापुढे माझ्या वडिलांचा फोटो लावाल तर...; बहिणीचा आमदार किशोर पाटलांना दम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 11:13 AM2022-11-03T11:13:02+5:302022-11-03T11:15:40+5:30
पाचोरा इथं उद्धव ठाकरे गटाकडून सभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटील यांचा समाचार घेतला.
जळगाव - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील शिवसेनेत २ गट पडले. त्यात उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक वेगळे झाले. मात्र जळगावात आमदार भावाने शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर बहिणीने उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणे पसंत केले. सध्या या बहिण-भावामध्ये राजकीय युद्ध पेटलं आहे. ज्यांनी तुम्हाला राजकारणाचा वारसा दिला त्यांच्याविषयी तुम्ही जे बोललात ते दुर्दैवी आहे. यापुढे माझ्या वडिलांचा फोटो लावाल तर खबरदार असा इशारा वैशाली सूर्यवंशी यांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना इशारा दिला आहे.
पाचोरा इथं उद्धव ठाकरे गटाकडून सभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटील यांचा समाचार घेतला. अलीकडेच किशोर पाटील यांनी एका कार्यक्रमात आर.ओ पाटील तात्यांनी त्यांचं दुकान बंद केले असं वक्तव्य केले होते. त्यावर सूर्यवंशी म्हणाल्या की, तात्यांनी कधी कोणतं दुकान उघडलंच नव्हतं. मात्र ज्यांनी तुम्हाला राजकीय वारसा दिला. आमदारकी बहाल केली. त्या तात्यांवर सुद्धा टीका करता. तर मग त्यांच्या फोटोचा आधार कशाला घेता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचसोबत स्वत:च्या बलबुत्यावर यापुढचं राजकारण करा, खबरदार जर तात्यांचा फोटो वापरला तर..तुम्ही तात्यांच्या विचारांवर चालणार नाही. तत्तांवर वागणार नाही. मग त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तात्यांनी सर्व उभं करून दिले. तात्यांचा फोटो वापरून संभ्रम निर्माण करत आहेत. त्या संभ्रमात तुम्ही अडकू नका असं आवाहन वैशाली सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांना केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"