ठाकरे गटाने कंबर कसली, गळती थांबवण्यासाठी मास्टर प्लान; आदित्य ठाकरेंसह ६० नेते लागले कामाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:54 IST2025-02-19T14:52:37+5:302025-02-19T14:54:47+5:30
Thackeray Group News: सातत्याने पक्षातून होणारी गळती थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आता कंबर कसून कामाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरे गटाने कंबर कसली, गळती थांबवण्यासाठी मास्टर प्लान; आदित्य ठाकरेंसह ६० नेते लागले कामाला?
Thackeray Group News: उद्धवसेनेचे माजी आमदार आणि अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याची चर्चा थांबविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत. आता ते पक्षाच्या आमदार आणि खासदारांशी स्वतंत्र चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर नेत्यांशी चर्चा केली. तसेच महत्त्वाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यानंतर आता खासदार, आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे.
अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर, दुसरीकडे भास्कर जाधव हेही ठाकरे गटाची साथ सोडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. मुंबईतील पदाधिकारीही उघडपणे नाराजी बोलून दाखवत आहेत. तसेच पक्षांतर्गत व्यवस्थापनावर ताशेरे ओढत संताप व्यक्त करत आहेत. असेच सुरू राहिले तर आगामी महापालिका निवडणुका ठाकरे गटाला जड जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या सगळ्याचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसल्याचे सांगितले जात आहे.
६० नेते लागले कामाला!
काही मीडिया रिपोर्टनुसार, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता, उपनेते, सचिव त्यांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काही जण पक्षविरोधी काम करत असल्याच निदर्शनास येत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी काही नेते, पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. तसेच यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, वाढत चाललेले डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे गट आता सक्रीय झाला आहे. ठाकरे गटाचे नेते आता सावध भूमिकेत आहेत. ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर आठवड्याला आढावा बैठक होऊ शकते. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे आणि इतर १४ जणांवर नेते पदाची, ४३ जणांवर उपनेतेपदाची आणि १० जणांवर सचिव पदाची जबाबदारी आहे. यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेमधील १४ महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना-भाजपा यापैकी एका पक्षाची निवड करत आहेत.