सत्तेत संगीत खुर्चीचा खेळ, आरक्षणावर सरकार गंभीर नाही; अनिल परबांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 06:33 PM2023-11-14T18:33:01+5:302023-11-14T18:33:25+5:30
जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करतं हे पाहावे लागेल असं अनिल परब म्हणाले.
मुंबई – निधी वाटपावरून जे शिंदे गटात गेले ते अजित पवारांवर नाराज होते, आज ते सगळे एकत्र आहेत. आता निधीवरून अजित पवार गटाचे लोक नाराज आहेत हे कळते. त्यामुळे हा सगळा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. कोणाला कधी खुर्ची मिळतेय, कोण कधी पळतंय हे दिसेल. जातीजातीत तणाव निर्माण होतोय. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायला हवे. परंतु सरकार या विषयात गंभीर नाही असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.
आमदार अनिल परब म्हणाले की, केवळ ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देतील अशा प्रकारचे वातावरण सरकारच्या वतीने केले जात आहे. नोंदी तपासल्या जातायेत. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्रे देतायेत. त्यात नवीन काही नाही. परंतु जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करतं हे पाहावे लागेल. जरांगे पाटलांनी डेडलाईन दिली आहे त्यामुळे थोड्या दिवसात कळेलच असं त्यांनी सांगितले.
आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाचं लक्ष
राहुल नार्वेकर हे वकील आहेत. त्यांना कायदा कळतो. लोकांच्या मनातले हे आमदार अपात्र झाले पाहिजेत अशी भावना आहे. जर नार्वेकर हे मनकवडे असतील तर ते लोकांच्या मनातला निर्णय देतील आणि पक्षाकडून आलेला निर्णय द्यायचा असेल तर वेगळा निर्णय देतील. परंतु यावर सुप्रीम कोर्टाचे बारकाईने लक्ष देतंय. या प्रकरणी जानेवारीच्या पहिला आठवड्यात सुनावणी आहे. त्यामुळे नार्वेकर काय निर्णय देतायेत त्यावर सुप्रीम कोर्टात काय व्हायचे ते होईल असं अनिल परब यांनी सांगितले.
‘ती’ जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच जिंकणार
ज्या लोकसभा उमेदवारीवरून रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्यात भांडणे आहेत. तिथे शिवसेनेचा उमेदवारच निवडून जाईल. अमोल किर्तीकर हेच लोकसभेत विजयी होतील याबाबत आम्ही ठाम आहोत. शिवसैनिकांच्या जोरावर, अपार मेहनत आणि कष्टावर तिथे उमेदवार निवडून गेलाय त्यामुळे आमच्या मनात शंका नाही. भाजपा ही जागा स्वत:कडे घेईल आणि शिंदेंकडे इतकी ताकद नाही ते ही जागा स्वत:कडे ठेवतील असा टोला ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी लगावला.
त्याचसोबत आम्ही गद्दार म्हटल्यावर त्यांना राग येतो, परंतु याच गद्दारीच्या कहाण्या महाराष्ट्रासमोर येतायेत. बाळासाहेब जिवंत होते तेव्हाच्या या घटना आहे. बाळासाहेबांच्या पाठीतही या लोकांनी खंजीर खुपसला होता हे दिसून येते. शिवसैनिकांना हे गद्दारी करतात माहिती आहे. किर्तीकरांनी पत्रक काढून ते जनतेला सांगितले. नारायण राणे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये सर्वात पहिले नाव रामदास कदम यांचे होते. परंतु बाळासाहेबांनी विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर कदम थांबले असा आरोपही परबांनी लावला.