“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 05:06 PM2024-09-28T17:06:45+5:302024-09-28T17:07:43+5:30
Thackeray Group Bhaskar Jadhav News: योजनांचा काही फायदा होणार नाही. बहिणींचा भावांवर विश्वास नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होणार, असा दावा ठाकरे गटाने केला.
Thackeray Group Bhaskar Jadhav News: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, या योजनेवरून ठाकरे गटाने महायुतीवर खोचक टीका केली आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी महायुतीवर खोचक शब्दांत टोलेबाजी केली आहे. जागावाटप समितीमध्ये नाही, त्यात हस्तक्षेप करत नाही. २६ जागा दिल्या आहेत, ५६ विधानसभा मतदारसंघावर आमचे लक्ष आहे. ५६ पैकी ३६ जागा निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. उद्धव ठाकरे घनश्याम मक्कासरे यांच्या संस्थेत शिवाजी महाराज पुतळा उद्घाटनाला येत आहे. वेळ मिळाल्यास नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी संवाद साधतील, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. विदर्भाचा संपर्क नेता म्हणून निवड झाल्यानंतर जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांचा बैठकी घेत आहे, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत
राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण ही योजना नाही तर ती लाडकी खुर्ची योजना आहे. १ कोटी १३ लाख ३२३ महिलांना याचा लाभ मिळणार असून ५ कोटी महिला मात्र वंचित राहणार आहेत. देवा भाऊ, नाथ एकनाथ, दादा असे तिघेही या योजनेचे श्रेय घेत असले तरी तिघेही भाऊ लबाड आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने महिला, शेतकरी आणि युवकांसाठी विविध योजना जाहीर केल्या तरी सर्व योजनाचा त्यांना निवडणुकीत काहीच फायदा होणार नाही. जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. हे तीनही भाऊ लबाड आहे. बहिणी यांना भाऊ मानायला तयार नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे निश्चित आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.
दरम्यान, विदर्भातून कुठले उमेदवार द्यावे, याबाबत चर्चा करुन चाचपणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत रामटेकची जागा आम्ही उदार अंतकरणाने काँग्रेससाठी सोडली होती. पूर्व विदर्भात २८ जागा आम्ही लढल्या होत्या. त्यातील काही जागा काँग्रेसकडे असल्या तरी नैसर्गिकदृष्ट्या त्यातील ८ ते १० मतदारसंघ आम्हाला परत मिळावे, अशी आमची मागणी आहे. सळसळत्या रक्ताचा शिवसैनिक विदर्भात आहे, म्हणून त्या आठ ते १० जागा परत मिळाल्या पाहिजे, असी मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत केली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, दक्षिण नागपूर आणि पूर्व नागपूर या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत, असे ते म्हणालेत.