“मी कशी दिसते आणि...”; शिरसाटांच्या ‘त्या’ विधानाला प्रियंका चतुर्वेदींचे सणसणीत प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:54 AM2023-07-31T10:54:30+5:302023-07-31T10:55:06+5:30
Thackeray Group Vs Shinde Group: संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर प्रियंका चतुर्वेदी तिखट शब्दांत प्रतिक्रिया देत चांगलेच खडसावले आहे.
Thackeray Group Vs Shinde Group: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडील काळात ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाला ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे.
ठाण्यातील मेळाव्यात केलेल्या भाषणात प्रियंका चतुर्वेदी यांनी गद्दारांना माफी नाही, असे म्हटले. प्रियंका चतुर्वेदी खरे तर काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या. तेथून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत भयानक वक्तव्य केले होते. खैरेंनी सांगितले की, आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींचे सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले. यावरून नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी पलटवार केला आहे.
मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही...
प्रियंका चतुर्वेदी यांनी एक ट्विट करत संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे, असे ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात हिंदी भाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणत टीका केली.