“भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून भाजपा २०० जागाही जिंकू शकणार नाही”; ठाकरे गटाचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 03:32 PM2024-02-13T15:32:00+5:302024-02-13T15:33:01+5:30
Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: अशोक चव्हाणांच्या जाण्याने महाविकास आघाडीला काही फरक पडणार नाही. भाजपाने काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
Thackeray Group Reaction On Ashok Chavan Joins BJP: काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. तर, अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही जिंकता येणार नाहीत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशावरून केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली. काँग्रेसबरोबर थेट युती करणे टाळून भाजपावाले अशा प्रकारे काँग्रेसशी युती करत आहेत. सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र करून ४०० पार उडी मारता येईल असे त्यांना वाटते. परंतु, भाजपा अशा पद्धतीने २०० पार जाणार नाही. कुठे नेऊन ठेवलीय भाजपा माझी? असे विचारायची परिस्थिती आहे. असेच चालत राहिले तर मोदींना देशात तोंड लपवून फिरावे लागेल, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे
सगळ्या पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भाजपा राजकारणात एक नवा आदर्श निर्माण करत आहे. भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा आता बदलली पाहिजे. कारण त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच पक्षात घेऊन शुद्धीकरण मोहीम चालवली आहे. महात्मा गांधी यांचे काँग्रेसचे शुद्धीकरण करण्याचे स्वप्न भाजपाने स्वीकारले आहे असे दिसते, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने ज्याप्रमाणे एक एक नेत्याच्या मागे शुक्लकाष्ट लावले आहे, ज्या वेगवेगळ्या चौकशा लावल्या आहेत. त्यामुळे तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी तात्पुरते का होईना भाजपावासी झालेले परवडेल अशी मन:स्थिती सर्वांनी केलेली आहे. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपावर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये अशोक चव्हाण पुढे होते. पण ते भाजपात गेलेले आहेत. त्यामुळे फरक काही पडणार नाही. आघाडी मजबूतच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.