...तर मी खासदारकी सोडायला तयार, माझ्यासमोर धडधडीत खोटं बोलले; संजय राऊत भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:06 PM2023-08-08T12:06:24+5:302023-08-08T12:07:01+5:30
अमित शाह आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वत:ची टिमकी वाजवतात असा आरोप संजय राऊतांनी केला.
नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. या अधिवेशनात राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले. त्यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी माझ्यासमोर धडधडीत खोटे बोलले, मला पाँईट ऑफ ऑर्डर मांडू दिला नाही असा घणाघात त्यांनी भाजपावर केला.
संजय राऊत म्हणाले की, माझं भाषण अमित शाह यांनी नीट समजून घेतले नाही. गृहमंत्री अमित शाहांनी माझ्या तोंडी खोटी वाक्ये घातली. त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे. आपले पंतप्रधान परदेशात जातात. त्यांचा सन्मान केला जातो. ते गळाभेटी करतात ही गळाभेट नरेंद्र मोदींची नसून आपल्या देशात जी महान लोकशाही परंपरा आहे. जी आम्ही टिकवली. त्या महान लोकशाहीवादी देशाच्या नेत्यांचा सन्मान आहे हे माझे स्पष्ट विधान आहे. त्यानंतर शाहांनी जोडले. लोकं सह्या घेतात, वाकून नमस्कार करतात. माझ्या तोंडी अशी वाक्ये असतील तर मी खासदारकी सोडायला तयार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच अमित शाह आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वत:ची टिमकी वाजवतात. महान लोकशाहीवादी देश म्हणून हिंदुस्तानची परंपरा आहे. या देशात लोकशाही आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव होतो आणि आपण या लोकशाही परंपरेला काळीमा फासताय असं मी भाषणात म्हटलंय. पण आपल्या सोयीने विरोधकांच्या तोंडी वाक्य घालायचे आणि आपले ढोल वाजवायचे. त्यावर मला पाँईट ऑफ ऑर्डर घ्यायचा होता, पण घेऊ दिला नाही. हे लोक खोटे बोलतायेत. माझ्यासमोर धडधडीत खोटे बोलत होते असा आरोपही खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, माझा आणि मल्लिकार्जुन खरगेंचा माईक बंद केला जातो. माझी दीड मिनिटे शिल्लक होती. मला ४ मिनिटे दिली होती. दीड मिनिटे बाकी होती. मी बोलण्याच्या ओघात पुण्यातील कार्यक्रमावर जात होतो. लोकशाही परंपरा कशी लोकमान्य टिळकांनी राखली आणि तो पुरस्कार मोदींना मिळाल आहे. म्हणून मोदींनी लोकशाही परंपरा राखली पाहिजे हे मला बोलण्याच्या आधी उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे उपसभापती आहेत त्यांनी माईक बंद केला, मला बोलू दिले नाही. ही लोकशाहीची गळचेपी आहे अशी टीकाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.