“बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार”; संजय राऊतांचे थेट भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 04:06 PM2023-09-27T16:06:56+5:302023-09-27T16:07:19+5:30
Maharashtra Politics: बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांसंदर्भात चाचपणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकार आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्यात अटी-तटीचा सामना पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. यातच बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असले तरी सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावरून तर्क-वितर्क लढवले जात असताना, बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच विजयी होणार, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक कोण लढवणार, यावरून चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे याच बारामतीमधून लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडी अन्य ठिकाणच्या जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेईल, असेही जयंत पाटील यांनी म्हटले होते. गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री बारामतीचा दौरा करत असल्याचेही दिसत आहे. यातच संजय राऊत यांनी बारामतीतील लढतीविषयी भाष्य केले आहे. ते मीडियाशी बोलत होते.
बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार
बारामतीत लोकसभेला नणंद विरूद्ध भावजय असा सामना होणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना, मला वाटत नाही, असा सामना बारामतीत होईल. या सगळ्या अफवा सुरू आहेत. राजकारण आम्हाला सुद्धा कळते. आम्ही सुद्धा राज्य केले आहे. आम्हाला पवार कुटुंब माहिती आहे आणि बारामतीचे राजकारणही माहिती आहे. कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यात जेव्हा दुष्काळ होता, तेव्हा तुम्ही सरकारी निवासस्थानी काय करत होतात? सिने कलाकारांसोबत उत्सव साजरे करत होतात. दुःखद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असावे याचा नैतिक भान असायला हवे. महाराष्ट्राचे राज्यकर्ते म्हणून जनतेचे दुःख हरण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्यांनी तुमच्याकडे असल्यामुळे तुम्हाला नागपूरमध्ये जाऊन लोकांचे दुःख जाणून घ्यायला हवे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.