“निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा ४०० पार नाही, तडीपार होणार”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 01:23 PM2024-03-16T13:23:10+5:302024-03-16T13:24:18+5:30

Sanjay Raut News: निवडणूक रोख्यांप्रकरणी मनी लाँडरिंगची केस भाजपावर चालवली पाहिजे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

thackeray group mp sanjay raut criticised bjp over electoral bond | “निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा ४०० पार नाही, तडीपार होणार”; संजय राऊतांची टीका

“निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा ४०० पार नाही, तडीपार होणार”; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut News: एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२४ या कालावधीत निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून प्रादेशिक पक्षांना ५,२२१ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. याच कालावधीत भाजपला मिळालेल्या ६०६०.५१ कोटी रुपयांच्या देणग्यांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांना मिळालेली रक्कम ८३९ कोटी रुपयांनी कमी आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनंतर विरोधकांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपावर घणाघाती टीका केली. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे सरकार हा देशाला लागलेला कलंक आहे. हा कलंक निवडणुकीतून धुऊन काढावा लागेल. निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा ४०० पार नाहीतर तडीपार होणार आहे. भाजपाला ४०० जागा हव्या आहेत. कारण त्यांना संविधान बदलायचे आहे. संविधान बदलल्यानंतर ते भ्रष्टाचार शिष्टाचारात बदलतील. निवडणूक रोख्याच्या योजनेला त्यांनी कायद्याचा आधार दिला होता. महात्मा गांधी फादर ऑफ नेशन होते, पंतप्रधान मोदी फादर ऑफ करप्शन आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. 

देशात हुकूमशाही सुरू झाली आहे

देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आला आहे, त्यातून “सिर्फ मै खाऊंगा…” हा मोदींचा नवा संदेश गावागावात गेला आहे. ‘ना खाऊंगा और न खाने दुँगा’, असे मोदी एकेकाळी म्हणाले होते. पण आता ‘मैं और मेरे लोग खायेंगे’ हा नवा संदेश आता सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, औषध कंपन्या, रुग्णालयांनी शेकडो कोटी भाजपाला दिले आहेत. गेमिंग कंपन्या, जुगार, ऑनलाईन लॉटरी कंपन्यांनी हजारो कोटी भाजपाला दिले. ईडी, प्राप्तीकर विभागाची कारवाई सुरू आहे, त्यांनी भाजपाला पैसे दिले. या प्रकरणी मनी लाँडरिंगची केस भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर चालवली पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. भाजपाकडून हजारो कोटींची लुटमार करून विरोधी पक्षाला नितिमत्ता शिकविण्याचा उद्योग केला जातो, असा मोठा आरोप संजय राऊत यांनी केला.
 

Web Title: thackeray group mp sanjay raut criticised bjp over electoral bond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.