“देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय, ते महाराष्ट्राला घाबरतात कारण...”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 09:32 PM2024-04-26T21:32:05+5:302024-04-26T21:36:02+5:30
Sanjay Raut News: पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचा राग आहे. मोदी भारताचे नाही तर गुजरातचे पंतप्रधान आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र होताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीचे टप्पे जसजसे पुढे सरकत आहेत, तसा प्रचाराला वेग आलेला पाहायला मिळत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी सभा झाली. या सभेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडले.
देशाच्या लढ्यात महाराष्ट्र सदैव पुढे असतो. यांची सत्ता उलथून टाकण्याची ताकद महाराष्ट्रात आहे. एकदा ठिणगी पडली की वणवा भडकतो. तुम्ही सगळे आयत्या बिळावर नागोबा आहेत. महाराष्ट्र लुटून सर्वकाही गुजरातला चालले आहे. महाराष्ट्राला कंगाल करण्याचे काम सुरु आहे, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय?
देश उभा करण्यात मोदी-शाहांचे योगदान काय? शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले की निर्यातबंदी करतात. आता गुजरातच्या पांढऱ्या कांद्यावरील बंदी उठवली. गुजरातची मत पाहिजे आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुःख मोदी-शाहांना कळणार नाही. मोदी आणि शाह महाराष्ट्राबद्दल सुडाचे राजकारण करतात. मोदी आणि शाहांना महाराष्ट्राचा राग आहे. मोदी-शाह महाराष्ट्राला घाबरतात. मोदींना वाटते गुजरात म्हणजेच देश आहे. भारताचे नाही तर गुजरातचा प्रधानमंत्री आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
दरम्यान, ही निवडणूक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र मोदी आणि शाह यांना जागा दाखवून देणार आहे. आपले भविष्य आपल्यालाच घडवायचे आहे. मोदी ते घडवू शकत नाहीत. मोदी गेल्या दहा वर्षात रोज खोटे बोलत आहेत. रोज कारस्थाने करणारे अमित शाह गृहमंत्री झालेत. पहिल्या टप्प्यातील बहुतांश जागेवर भाजपचा पराभव होणार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.