“मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते”; संजय राऊतांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 11:57 AM2024-01-19T11:57:03+5:302024-01-19T11:57:55+5:30
Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. याचा धसका भाजपाने घेतला आहे. म्हणून लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पंतप्रधान मोदीच येऊन प्रचार करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी मतदार नाहीत. हे पंतप्रधान मोदी यांनी समजून घेतले आहे. त्यामुळे वारंवार त्यांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. मणिपूरला लोकसभेच्या २५ जागा असत्या तर PM मोदी लगेच तिथे गेले असते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि राहुल गांधींच्या न्याय यात्रेचा मोदींनी धसका घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिथे राजकीय फायदा दिसतो, तिथेच जातात. मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला गेले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या तिथे त्यांना फायदा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही
राष्ट्रहित, जनहिताचे भाजपाला पक्षाला काही घेणे देणे नाही. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सुमारे ८५ जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जास्त लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला गेले पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेले पाहिजे, तसेच म्यानमारच्या सीमेवर, लडाखलाही जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला. मालदिवशी भांडण केले हेही राजकारण आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.
दरम्यान, देशाची ८८ टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे असे अहवाल सांगतो. नोकरी मागणाऱ्यांना रामललाचे फुकट दर्शन देत आहेत. ८८ टक्के जनता नोकरी शोधत असेल तर हा देशच बेरोजगार झाला आहे. प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र पदवीधरांना ते पकोडे तळायला लावतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.