"नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:42 AM2023-09-27T11:42:19+5:302023-09-27T11:42:59+5:30
महाराष्ट्र संकटात आहे, नागपूरमध्ये पूर आलाय, अनेक भागात दुष्काळ आहे. मुख्यमंत्री तिथे असायला हवेत. पण तुम्ही उत्सव साजरा करतायेत असं राऊतांनी टीका केली.
मुंबई – आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित केले. तुम्ही तिथे जाण्याची गरज काय? असं विचारले, कुठल्या ठिकाणी भेट देणार आहे असं विचारले. मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा, का? कशासाठी, महाराष्ट्राला गरज काय आहे?. नागपूर पाण्यात बुडलंय, तिथे तुम्ही गेला नाही. नागपूर पाण्यात बुडालंय आणि तुम्ही सिनेकलाकारांसोबत घरात उत्सव साजरा करताय अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबई, नागपूरात काय घडत नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या घरी कॅमेरे फिरतायेत, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड जमा होतंय. तुम्ही परदेश दौऱ्यावर कोणती गुंतवणूक आणायला चालला आहात. जी गुंतवणूक गुजरातमध्ये गेलीय ती पहिली आणा. मुंबईतून मोठमोठे आंतरराष्ट्रीय संस्था, कार्यालये अहमदाबादला जातायेत ते आणा त्यानंतर परदेश दौऱ्यावर जा. परदेश दौरा रद्द केला, भीती असायला हवी. ही भीती आदित्य ठाकरेंची आहे, शिवसेनेची आहे, जनतेची आहे. ती असायला हवी असंही त्यांनी म्हटलं.
तसेच महाराष्ट्र संकटात आहे, नागपूरमध्ये पूर आलाय, अनेक भागात दुष्काळ आहे. मुख्यमंत्री तिथे असायला हवेत. पण तुम्ही उत्सव साजरा करतायेत. गणपती उत्सव साजरा करू नका हे मी म्हणत नाही. परंतु ज्यारितीने अनेक हिरो-हिरोईन, खान वैगेरे येतायेत, मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंब मज्जा घेतायेत आणि राज्यातील जनता दु:खाच्या डोंगराखाली दबली आहे. ही आज राज्याची हालत आहे असंही खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द झाला. महाराष्ट्रात दुष्काळ आहे हे आदित्य ठाकरेंनी ट्विट केल्यावर समजलं, दु:खद प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असले पाहिजे याचे नैतिक भान त्यांना असायला हवे. कलाकार कुठेही नाचतील, उद्या दुसरा मुख्यमंत्री बसला तिथेही जातील. ते येतात आणि जातात. परंतु विघ्नहर्ता गणपती असतानाही राज्यावर विघ्न आलेले आहे. हे विघ्न दूर करण्याची राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असताना तुम्ही दुष्काळग्रस्त भाग असो वा नागपूर पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेलेला आहात? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.