“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:41 IST2025-04-09T17:39:17+5:302025-04-09T17:41:05+5:30
Thackeray Group Sanjay Raut News: राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

“...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर”; संजय राऊत नेमके काय म्हणाले?
Thackeray Group Sanjay Raut News: गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तर, हे भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यावरून मनसे आक्रमक झाली असून, राजकीय वर्तुळातील काही पक्षांकडून मनसेवर टीका केली जात आहे.
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसेला राज ठाकरे पाठिंबा देत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरील कारवाईसंदर्भात निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे, असे शुक्ला यांनी म्हटले आहे. तर, मनसेची मान्यता रद्द करावी, यासाठी कुणीतरी उत्तर भारतीय म्हणे न्यायालयात गेला आहे. मराठी प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या षड्यंत्रामागे भाजप आहे, असे मनसे संदीप देशपांडे म्हणाले. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार यांनी भाजपावर टीका केली आहे.
...तर सर्वांत आधी भाजपाची मान्यता रद्द करा, मनसे वगैरे नंतर
धार्मिक द्वेष हा विषय असेल तर सर्वांत आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी. धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचे काम या देशात कोणी करत असेल तर ते काम भाजपा करत आहे. भाजपाचे प्रचारक, कोणीतरी धीरेंद्र शास्त्री असे म्हणतात की, कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा नये. गावांमध्ये केवळ हिंदूंनी राहावे. अशा प्रकारची भाषा करणारे लोकही या देशात आहेत. ते बुवा देखील असेच म्हणतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या बुवाच्या दर्शनाला जातात. मोदी त्या बुवाचे दर्शन घेतात, त्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात याचाच अर्थ मोदींची त्या शास्त्रीबुवांच्या म्हणण्याला मान्यता आहे. त्यामुळे हा धार्मिक द्वेषाचा मुद्दा असेल तर धार्मिक द्वेष पसरवला म्हणून सर्वांत आधी भारतीय जनता पार्टीची मान्यता रद्द करायला हवी. पक्षाची मान्यता रद्द करण्यास भाजपापासूनच सुरुवात करायला हवी. मनसे वगैरे नंतरचे पक्ष आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे विषणूचे आवतार... आहेत का? तिकडे ट्रम्प भारताला धु-धु धुतोय आणि विष्णूचे अवतार गप्प आहेत. अख्ख जग ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात उठले आहे आणि केवळ एकच देश भारत देश तोंडात गोळ्या घालून बसलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत ना, मग या देवाने ट्रम्प यांच्यावर सुदर्शन चक्र सोडायला हवे. काही बोलतात हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे आणि रत्नागिरीचे उदय सामंत. सत्तेवर बसले आहेत. भोंगे सुटले आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.