भाजपाचे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस? संजय राऊतांची संतापले; म्हणाले, “होऊच शकते कारण...”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 12:31 PM2024-12-11T12:31:10+5:302024-12-11T12:33:07+5:30
Thackeray Group MP Sanjay Raut News: भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Thackeray Group MP Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे अजूनही गृहखात्यावरील दावा सोडलेला नसल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजपा महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना भाजपावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० हून अधिक जागा मिळवून बहुमतासह राज्यात सरकार बनवले. त्यातच मविआचे अनेक खासदार भाजपाच्या संपर्कात आले आहेत. विशेषत: शरद पवार गटाचे खासदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याने भाजपा पवारांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत आहे. याबाबत भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दावा केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते
भाजपा कोणतेही ऑपरेशन लोटस करू शकते. कारण त्यांच्याकडे पैसा आणि यंत्रणा आहे. याआधीही अशा प्रकारे माणसे फोडलेले आहेत. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासारखी माणसे का पळून गेले? भीती पोटीच गेले ना? ते पण ऑपरेशन लोटस नव्हते तर ऑपरेशन डर होते. त्यामुळे ते घाबरून तिकडे गेले. भाजपाबरोबर गेल्यानंतर त्यांची जप्त केलेली संपत्ती परत द्यायची. हे असे सुरु आहे. भाजपाच्या सत्तेकडे नैतिकता नावाचा कोणताही प्रकार नाही. आता २० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल. गृहखाते कोणाकडे द्यायचे हे ठरत नसेल तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न गंभीर होत चालला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, निश्चितपणे मविआचे खासदार-आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. मविआचे खासदार विशेषत: शरद पवारांचे खासदार आहेत तिथे महायुतीचे आमदार निवडून आले. विकास त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत ते हालचाली करत आहेत. केंद्रात भाजपा युतीचे आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, ज्यासाठी आपण निवडणूक लढवतोय तो विकास त्यातून शरद पवारांच्या पक्षातील खासदार भाजपासोबत येण्याचा विचार करू शकतात, असे त्यांनी सांगितले.