Kasba Bypoll Election Result 2023: “भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला असाच उद्ध्वस्त करु”; कसबा निकालानंतर संजय राऊतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 05:04 PM2023-03-02T17:04:41+5:302023-03-02T17:05:04+5:30
Kasba Bypoll Election Result 2023: ही परिवर्तनाची नांदी आहे. यापुढे महाराष्ट्रही जिंकू, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
Kasba Bypoll Election Result 2023: महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अनपेक्षित विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
कसबा हा त्यांचा बालेकिल्ला आहे, असे त्यांना आतापर्यंत वाटत होते. येथील विशिष्ट वर्गाच्या मतांवर आपले एकतर्फी वर्चस्व आहे, असे त्यांना वाटत होते. मात्र त्या पेठांमधील सगळी मते मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला मिळाली आहेत. हे लक्षात घ्या. मी परत सांगतो, भाजपसोबत शिवसेना उभी होती, त्यामुळे आतापर्यंत त्यांचे बालेकिल्ले भक्कम राहिले होते. आता त्यांचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उद्ध्वस्त करू, असा थेट इशारा संजय राऊतांनी दिला आहे.
पुढील वेळी आम्ही चिंचवडही जिंकू, महाराष्ट्रही जिंकू
ही परिवर्तनाची नांदी आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. कसब्यात आतापर्यंत शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजप जिंकत आली आहे. महाराष्ट्राला, दिल्लीला आणि फडणवीसांना कळले असेल की खरी शिवसेना कुठे आहे. चिंचवडची जागाही आम्ही पहिल्या फेरीपासून जिंकू शकत होतो. तिथे अजून संघर्ष सुरू आहे. पण तिथे भाजप आणि मिंधे गटाने तिसरा उमेदवार उभा करून मतांची विभागणी केली. पुढच्या वेळी आम्ही चिंचवडही जिंकू, महाराष्ट्रही जिंकू, ही सुरुवात आहे, असे सांगत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला.
दरम्यान, कसबा पेठ पोडनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा झालेला विजय ही धनशक्तीवर जनशक्तीने केलेली मात आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने महाविकास आघाडीला बुस्ट मिळाला आहे. यामध्ये एक महत्त्वाचे निरीक्षण असे की, भाजपसोबत जोपर्यंत ओरिजिनल म्हणजे खरी शिवसेना होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्यासोबत होते, तोपर्यंत कसबा येथे विजयाची खात्री होती. ज्या क्षणी खऱ्या शिवसेनेची साथ सोडली, तेव्हा खरी शिवसेना महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिली. आता त्याची परिणिती रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. रवींद्र धंगेकर हे सामान्य व्यक्ती आहेत. त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"