“प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, अकोल्याची जागा ही...”; संजय राऊत थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 11:48 AM2024-01-08T11:48:16+5:302024-01-08T11:51:40+5:30
Sanjay Raut News: संविधानाची नासधूस करणाऱ्यांना जनता कोणत्याही परिस्थितीत मत देणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील विरोधकांची इंडिया आघाडी यांच्यात सर्वकाही आलबेल आहे, असे चित्र नाही. जागावाटपावरून दावे-प्रतिदावे केले जात असून, आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली आहे. आंबेडकरी विचारांची जनता कोणत्याही परिस्थितीत संविधानाची नासधूस करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना मत देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांचाही हाच विचार आहे. लवकरच याबाबत निर्णय होईल. महाविकास आघाडीत एक मत नक्की आहे. अकोला ही जागा परंपरेनुसार प्रकाशजी लढतात, त्यांनीच ती जागा लढावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
...म्हणून दिल्लीत जाऊन चर्चा करू
मुंबईतील चर्चा मुंबईत होतात. काँग्रेस हायकमांड दिल्लीत आहेत. त्यांना एकेक जागेसाठी दिल्लीत जावे लागते. त्यांची सोय आम्ही पाहात आहोत. शिंदे गटाचे, अजित पवार गटाचे हायकमांड दिल्लीत आहे. अमित शाह, जे पी नड्डा यांना भेटावे लागते. आम्हाला मुंबईत बसायचे आहे, ही काँग्रेसची सोय आहे. आमची सोय नाही. म्हणून दिल्लीत जाऊन चर्चा करू, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा होता. आताच्या मुख्यमंत्र्यांच्या मानेला तो पट्टा नाही, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले की, मानेचा पट्टा हा एक आजार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीच्या पट्टा आहे.