मविआ जागावाटप: उद्धव ठाकरे चर्चेसाठी दिल्लीला जाणार? संजय राऊतांचे सूचक भाष्य, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 11:58 AM2024-01-02T11:58:13+5:302024-01-02T11:58:39+5:30
Maha Vikas Aghadi News: जागावाटपासंदर्भात दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Maha Vikas Aghadi News: काँग्रेस नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या सहकारी पक्षांना १५ जानेवारीपूर्वी जागावाटपाची चर्चा पूर्ण करण्यास उत्सुक आहे, असे संकेत दिले आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल. काँग्रेस ४ जानेवारीनंतर इंडिया आघाडीतील सहकारी पक्षांसोबत जागा वाटपावर औपचारिक संभाषण सुरू करेल. तत्पूर्वी त्यांच्या राज्यातील नेत्यांकडून त्या त्या राज्यातील परिस्थितीबद्दल अहवाल सादर होणार आहे. यातच राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसची वेगळी भूमिका असून, त्यावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मीडियाशी बोलताना संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत असे तुम्हाला कुणी सांगितले? काँग्रेसचे वरिष्ठ नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याशी उद्धव ठाकरेंचा चांगला संवाद आहे. त्यामुळे जागावाटपाच्या विषयात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. भविष्यात आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही दिल्लीत जाऊ. काँग्रेसचा जागावाटपासंदर्भातला विषय आम्ही दिल्लीत बसून सोडवू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
उद्या भाजपा सत्तेत नसेल, तर आपण कुठे असाल हाही विचार करून ठेवा
काँग्रेसचे अनेक लोक भाजपामध्ये येणार असल्याचे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, त्यांनी अनेक पक्ष बदलले. ते शिवसेनेत होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भाजपात आहेत. पक्षांतराची ज्यांना चाड नसते, असे लोक अशी वक्तव्य करत असतात. त्यांच्याविषयी मी काय बोलणार? कोण जातेय, कोण राहतेय हे येणारा काळ ठरवेल. उद्या भाजपा सत्तेत नसेल, तर आपण कुठे असाल हाही विचार करून ठेवा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, जागावाटपासंदर्भात दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असून लवकरच त्यासंदर्भात माहिती दिली जाईल, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले. यावर, सुप्रिया सुळेंनी जर सांगितले की महाविकास आघाडीत जागावाटपावर कोणतेही मतभेद नाहीत आणि लवकरच यासंदर्भात घोषणा होईल, तर मी त्याचे स्वागत करतो. आम्ही सगळे एक आहोत. एक-दोन जागांसाठी आम्ही आघाडीत तणाव निर्माण करणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.