“उद्धव ठाकरे-शरद पवारांचेच पक्ष खरे, तुमच्यासोबतचे नकली”; संजय राऊतांचा अमित शाहांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:35 PM2024-04-12T12:35:05+5:302024-04-12T12:35:12+5:30
Sanjay Raut News: तुम्ही मातोश्रीवर अनेकदा नाक रगडायला आला आहात. तीच खरी शिवसेना आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रातील नेते राज्यात प्रचाराला येण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाह यांची राज्यात सभा झाली. तसेच भाजपाचे अन्य नेते, मंत्री, अन्य राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात प्रचार करताना दिसत आहेत. अमित शाह यांनी या सभेत महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
आमच्यासमोर जे निवडणूक लढत आहेत, ते राहुल गांधींच्या नेतृत्वात लढत आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष आमच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धीमुर्धी काँग्रेस पार्टी. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अर्धा राहिला. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अर्धा झाला. या दोघांनी काँग्रेसलाही अर्धे करुन टाकले. हे अर्धवट पक्ष महाराष्ट्राचे भले करु शकतात?, अशी विचारणा अमित शाह यांनी सभेत केली. निवडणूक झाली की मतभेदांनीच ही आघाडी फुटून जाईल. आम्ही सगळे मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत, असे अमित शाह यांनी म्हटले होते. यावर संजय राऊतांनी पलटवार केला.
उद्धव ठाकरे-शरद पवारांचेच पक्ष खरे, तुमच्यासोबतचे नकली
संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला नकली म्हणाले होते. पण सांगू इच्छितो की असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही. तुमच्या हातात पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांना हाताशी धरुन पक्ष खरा की खोटा ठरवणार असाल तर जनता ते सहन करणार नाही. याच नकली शिवसेनेचे प्रमुख तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे त्यांच्यासमोर नाक रगडायला तुम्ही मातोश्रीवर अनेकदा आला आहात. २०१९ ला मातोश्रीवर आलात तेव्हा हीच शिवसेना असली होती, या शब्दांत संजय राऊतांनी पलटवार केला.
दरम्यान, खोटे गोटे गळ्यात अडकवून फिरत आहात. त्यांना असली म्हणत आहात. मात्र हेच तुमचा कपाळमोक्ष करतील. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हेच दोन खरे पक्ष आहेत. बाकी अमित शाह यांनी जे डुप्लिकेट पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवारांन दिले आहेत, त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही, असा एल्गार संजय राऊतांनी केला.