संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर; म्हणाले, “आहे का डील मंजूर?”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 01:14 PM2023-04-14T13:14:04+5:302023-04-14T13:18:59+5:30
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी वज्रमूठ सभेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी खुली ऑफर दिली आहे. काय आहे डील?
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आधी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर लगेचच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. यातच महाविकास आघाडीच्या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली. याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार करत निशाणा साधला.
महाविकास आघाडीच्या वज्रमुठीचे छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही. महाविकास आघाडीची अवस्था सध्या फारच वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी ९ वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी १२ आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो. या भोंग्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकमत नसल्याचे फडणवीस म्हणाले. यावर आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना खुली ऑफर दिली आहे.
आहे का डील मंजूर?
मी तुमच्या घरासमोर येऊन प्रतिक्रिया देतो. त्यानंतर तुम्हीही त्यावर उत्तर द्या. नाही तर तुमची कारस्थाने थांबवा. मी सकाळी सकाळी बोलण्याचे बंद करतो. आहे का डील मंजूर? अशी ऑफरच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली. तुमच्या सागर बंगल्यावर ९ वाजता पीसी घेईन. तुम्ही साडेनऊला बोला. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. माझ्या पक्षाचा मी प्रवक्ता आहे. सामनाचा कार्यकारी संपादक आहे. खासदार आहे. माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा मला अधिकार आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? याचा अर्थ ते आम्हाला घाबरत आहेत. शिवसेना कागदावर तोडली असेल. निवडणूक आोयगाच्या माध्यमातून तुम्ही कुणाला शिवसेना दिली असली तरी खरी शिवसेना इथे आहे. जमीनीवर आहे. आमच्यात आहे. तुम्ही आमच्याशी सामना करू शकत नाही. आमची एवढी भीती वाटते. आम्ही बोलू नये वाटत असेल तर बेकायदेशीर कृत्य थांबवा. कायद्याने राज्य करा. लांड्यालबाड्या करून तुम्ही विरोधी पक्षांना त्रास देत असाल तर आम्ही बोलू. तुम्ही तुमची कारस्थानं थांबवा आम्ही तुमच्यावरचे हल्ले थांबवू. सरळ डील आहे. स्वीकारता का विचारा त्यांना? या शब्दांत संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.
दरम्यान, ही त्यांच्या मनातील भीती आहे म्हणून वारंवार ते वज्रमूठ सभेवर बोलत आहेत. मी आज नागपूर ला चाललो आहे. सभा होणारच, असे सांगत, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. विरोधी पक्षांचे ऐक्य कधीच कमी होणार नाही. २०२४ मध्ये सत्ता परिवर्तन निश्चित होणार आहे. त्याची ही सुरूवात आहे, असा दावा संजय राऊतांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"