“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 05:42 PM2024-09-21T17:42:12+5:302024-09-21T17:45:21+5:30
Sanjay Raut News: महाराष्ट्राला मान्य असलेला चेहरा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Sanjay Raut News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून चर्चा, बैठका सुरू आहेत. यातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, ते जाहीर करावे, असा आग्रह धरला आहे. तर महाविकास आघाडीतील नेते याला दाद देताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोण मुख्यमंत्री होणार, यावर चर्चा होऊ शकेल, असे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील नेते म्हणत आहेत. यातच ज्याच्या जास्त जागा असतील, त्याचाच मुख्यमंत्री असे कोणतेही सूत्र महाविकास आघाडीत नसल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सलग चार दिवस महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते जागा वाटपासाठी बसलो. जो जिंकेल तो त्या जागेवर लढेल हे आमचे सूत्र आहे. २८८ जागांवरती नजर देताना प्रत्येक घटकाचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. चार दिवस बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतात. पुन्हा बसावे लागेल. प्रत्येकाची स्वातंत्र मत असतात, पण हे जागा वाटप शांततेत आणि सहज पार पडेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही
ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असे कोणतेही सूत्र ठरले नाही आणि ठरणार नाही. महाराष्ट्राला मान्य असलेला चेहरा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच आमचे एकच सूत्र आहे एकत्र लढायचे आणि आमचे सरकार आणायचे, त्यासाठी कोणाला त्याग करावा लागला तरी चालेल. दोनशे जागांवर आमच्यामध्ये संमती झाली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, आम्ही कोणताही फॉर्म्युला समोर ठेवून निवडणुका लढत नाही. लोकसभेला कुठला फॉर्मुला नव्हता. विधानसभेला आम्ही अशाच प्रकारे कुठल्याही फॉर्मुलाविना निवडणूक लढू. आघाडीच्या जागावाटप आम्ही एवढ्या जागा लढवू तेवढ्याच जागा लढू असे होऊ देणार नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या आधी जागावाटप पूर्ण होईल. जागावाटप पूर्ण झाल्यावर जाहीरनाम्यावर बैठका घेऊ किंवा एकत्रित प्रचार कसा करता येईल यावर काम करू, असे संजय राऊत म्हणाले.