एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केलेली का?; संजय राऊतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 11:24 AM2023-09-30T11:24:17+5:302023-09-30T11:25:41+5:30
उद्धव ठाकरेंचा फुटलेला गट नाही. शिंदेंचा फुटलेला गट आहे अशी टीका संजय राऊतांनी केली.
मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली असं विधान करत राऊतांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरेंची कार्याध्यक्षपदी निवड झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या संपूर्ण कार्यकारणीने उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड केली. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील आहे. उद्धव ठाकरेंचा फुटलेला गट नाही. शिंदेंचा फुटलेला गट आहे. आता महाराष्ट्रात त्यांच्या हातात सत्ता आहे. दिल्लीची सत्ता आहे. त्यामुळे काहीही कराल हे चालणार नाही. गेल्यावर्षी दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला यंदाही तिथेच होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितले.
तसेच शिवसेना एकच आहे, जी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आहे. बाकी सर्व चोर, लफंगे सर्वत्र असतात. जर कुणी मीच खरी शिवसेना, मीच राष्ट्रवादी, मीच काँग्रेस असं कुणी म्हणू शकत नाही. तुमच्याकडे सत्ता असल्याने मनमानी करणार का? असा सवाल संजय राऊतांनी विचारला.
निर्णय घ्यायला विधानसभा अध्यक्षांना वेळ नाही
विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायेत, ते १ वर्षापासून करतायेत, त्यात नवीन काय? आता घाना दौऱ्यावर होते, तिथे लोकशाहीवर भाषण होते. लोकशाही वाचवणे विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे. आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाने कालमर्यादा दिली, विधानसभा अध्यक्षांच्या घाना दौऱ्याला आम्ही विरोध केला. आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारी होतो. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही मानायला तयार नाहीत. राज्यात घटनाबाह्य सरकार विधानसभा अध्यक्षांच्या मदतीने चालवले जातंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरतील असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असतानाही त्यांच्यासंदर्भात निर्णय घ्यायला विधानसभा अध्यक्षांना वेळ नाही. ते घानाला जाणार होते, परंतु आता त्यांचा दौरा रद्द केला आहे असं संजय राऊतांनी सांगितले.