ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना धमकी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:58 PM2023-04-01T12:58:15+5:302023-04-01T12:59:04+5:30
या धमकीबाबत कुणीही चेष्टा केली नाही. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे असा टोला फडणवीसांनी लगावला.
मुंबई - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे यांची बाजू माध्यमांमध्ये भक्कम आणि आक्रमकपणे मांडत असतात. त्यात संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी देणारे प्रकरण समोर आले. तू दिल्लीत भेट तुला एके ४७ ने उडवतो. तुझा मुसेवाला करतो तू आणि सलमान फिक्स अशी धमकी संजय राऊतांना व्हॉट्सअपद्वारे देण्यात आली. या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊतांना जी धमकी आली ती खरी आहे. याचा तपास केला असता एका व्यक्तीला ताब्यात घेतले. दारुच्या नशेत त्या व्यक्तीने अशाप्रकारे धमकी दिली असा प्राथमिक रिपोर्ट आहे. मात्र संपूर्ण तपास केला जाईल. कुणीही धमकी दिली असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणी कुणाला धमकी दिली तरीदेखील याठिकाणी सरकार, पोलीस शांत बसणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच या धमकीबाबत कुणीही चेष्टा केली नाही. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. मी गृहमंत्रिपदावर राहिलो नाही तर बरे होईल असं अनेकांना वाटते. पण मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार दिला आहे. जे कुणी चुकीचे काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून मी यापूर्वीही ५ वर्ष कारभार सांभाळला आहे. आताही जे बेकायदेशीर कामे करतील त्यांना सोडणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. दरम्यान, मी कुणाला घाबरत नाही. कुणाला दबत नाही असंही त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात आमदार सुनील राऊत यांनी याबाबत तक्रार नोंदवली आहे. वारंवार धमक्या येत असतात. याबाबत गृहमंत्री, पोलिसांना सांगूनही कारवाई होत नाही. आज पुन्हा धमकी आली आहे. वरिष्ठांना कळवले आहेत. माझ्या घरी, वारंवार धमक्या येत असतात. संजय राऊत हे महाराष्ट्राचे नव्हे तर आता देशाचे नेते आहेत. अशा व्यक्तीला धमक्या येऊनही कारवाई केली जात नाही असा आरोप आमदार सुनील राऊत यांनी केला.