“नीलम गोऱ्हे ५० लाख अन् मर्सिडीज देऊन साहित्य संमेलनात”; संजय राऊतांचे मंडळाला खरमरीत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:58 IST2025-02-24T09:56:37+5:302025-02-24T09:58:25+5:30

Thackeray Group MP Sanjay Raut News: आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

thackeray group mp sanjay raut wrote letter to the akhil bharatiya sahitya mahamandal over neelam gorhe allegations | “नीलम गोऱ्हे ५० लाख अन् मर्सिडीज देऊन साहित्य संमेलनात”; संजय राऊतांचे मंडळाला खरमरीत पत्र

“नीलम गोऱ्हे ५० लाख अन् मर्सिडीज देऊन साहित्य संमेलनात”; संजय राऊतांचे मंडळाला खरमरीत पत्र

Thackeray Group MP Sanjay Raut News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप शिंदेसेनेच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी केला आहे. दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमातील मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. यावरून ठाकरे गटानेही नीलम गोऱ्हे यांच्यावर पलटवार केला. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला खुले आणि खरमरीत पत्र लिहिले आहे. 

संजय राऊत या पत्रात लिहितात की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (९८वे) दिल्लीत साजरे झाले. त्याबद्दल मराठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन. दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. साहित्य महामंडळाच्या परंपरेस हे शोभणारे नाही. या चर्चा परिसंवादात काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा सरळ राजकीय गैरवापर केला. तसेच आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे काय? असा सवाल संजय राऊत यांनी या पत्रातून केला आहे.

साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी

दिनांक २३ फेब्रुवारी रोजी 'असे घडलो आम्ही' या परिसंवादात नीलम गोहे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली. साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरित माफी मागावी, अशी मागणी संजय राऊतांनी केली. तसेच नीलम गोन्हे यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून बाहेर पडताच तालकटोरा मैदानाबाहेर पत्रकारांना सांगितले की, "मी महामंडळाच्या सदस्यांना ५० लाख रुपये देऊन या कार्यक्रमात सहभागी झाले व उषा तांबे यांना त्याआधी एक मर्सिडीज गाडी भेट देऊन या कार्यक्रमाचे आयोजन करायला लावले." हे खरे की खोटे माहीत नाही, पण महामंडळाच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धक्का बसला आहे. साहित्य महामंडळ विकले गेले आहे अशी चर्चा लोकांत होणे हे चित्र चिंताजनक आहे, या शब्दांत संजय राऊतांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, डॉ. नीलम गोन्हे यांनी ८ मर्सिडीज दिल्याचा पुरावा द्यावा, पावत्या दाखवाव्या, असा पलटवार उद्धवसेनेने केला. गोन्हे यांनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले की, हे सगळे गयेगुजरे लोक आहेत. त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. राजकारणात त्यांनी त्यांचे चांगभले करून घेतले आहे. त्या महिला आहेत, त्यावर मी काही बोलणार नाही. स्वतः मर्सिडीजमधून फिरत आहेत, मग लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या? असे म्हणत ठाकरे यांनी गोन्हे यांना टोला लगावला. नीलम गो-हे यांना शिवसेनेने अनेक पदे दिली, त्यावेळी त्यांनी मर्सिडीज दिली असेल तर त्याच्या पावत्या त्यांनी द्याव्या, असा टोला खासदार संजय राऊत यांनी हाणला.

 

Web Title: thackeray group mp sanjay raut wrote letter to the akhil bharatiya sahitya mahamandal over neelam gorhe allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.