“२२ आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत, ९ खासदारही संपर्कात”; ठाकरे गटाचा मोठा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 04:31 PM2023-05-28T16:31:59+5:302023-05-28T16:34:17+5:30
Maharashtra Politics: अनेक आमदार, मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे संपर्क करायला सुरुवात केली. काहींशी प्रत्यक्ष बोलणे झाले आहे, असा दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारी सुरू केली असली तर जागावाटपावरून आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्षही सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच आता २२ आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून, ९ खासदारही संपर्कात असल्याचे मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा मोठा दावा केला आहे. मीडियाशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले आहेत. हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत आणि १३ पैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत. खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. कामे होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळत आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे.
शंभूराजे देसाईंनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला
शंभूराजे देसाईंनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला. आमची इकडे गळचेपी होत आहे, असे शंभुराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. तानाजी सावंत आणि गजानन कीर्तिकर यांनी असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. तानाजी सावंत यांना बजेट मिळत नाही. आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचे ते म्हणत आहेत. भाजपने आता शिंदे गटाला नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची कोंडी झाली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, अनेक आमदार आणि मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे संपर्क करायला सुरुवात केली आहे. काहींशी तर प्रत्यक्ष बोलणे सुद्धा झालेले आहे. त्या लोकांची नावे योग्यवेळी जाहीर करू. लवकरच बॉम्बस्फोट होणार आहे. गजानन कीर्तिकर यांनी फटाके फडोले आहेत. त्यांना दट्ट्या मिळाल्यावर ते गप्प बसतील. पण थोडे थांबा फटाक्याची माळच लागणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.