“विधानसभेच्या १८५, लोकसभेच्या ४० जागा आम्ही जिंकणार, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:34 PM2023-04-19T12:34:19+5:302023-04-19T12:35:18+5:30
Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असून, किमान १०० ते ११० जागा कमी होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut News: महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. यातच लोकसभा निवडणुकीची मोठी तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. महानगरपालिका निवडणुकाही कधीही लागू शकतात, अशी चर्चा आहे. तसेच विधानसभा निवडणुकांच्या बाबतीतही नवनवीन अंदाज बांधले जात आहेत. यातच आम्ही विधानसभेच्या किमान १८५ तर लोकसभेच्या ४० जागा जिंकणार असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४० जागा मिळणार असल्याचा दावा यापूर्वी केला होता. मात्र, आता पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार यावर भाष्य केले आहे. भाजपचा सर्व्हे बाहेर कसा आला? त्यावर आपण कशाला विश्वास ठेवायचा? असा सवाल करतानाच आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. लोकभावना भाजपच्या विरोधात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या १८५, लोकसभेच्या ४० जागा आम्ही जिंकणार
भाजपने मिंधे गटाबरोबर एक केमिकल लोचा करून ठेवला आहे. या राज्याचे संपूर्ण जनमत या केमिकल लोच्याविरोधात आहे. हिंमत असेल तर आता निवडणुका घ्या. महापालिकेची टाळाटाळ करता तशी विधानसभा निवडणुकीची टाळाटाळ करू नका. महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा. विधानसभेच्या किमान १८५ आणि लोकसभेच्या ४० जागा आम्ही जिंकणार आहोत, असा दावा करत यासाठी कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. अंतर्गत नाही आणि बाहेरच्या अशा कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
भाजपला लोकसभेच्या किमान १०० ते ११० जागा कमी होतील
लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा दावा करताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगना, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्य यावेळी भाजपच्या पाठिशी उभी राहणार नाहीत. भाजपला लोकसभेच्या किमान १०० ते ११० जागा कमी होतील. त्यासाठी सर्व्हेची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"