“आम्हाला नारायण राणेच उमेदवार म्हणून हवे होते, कारण...”; संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 02:01 PM2024-04-19T14:01:45+5:302024-04-19T14:02:57+5:30
Sanjay Raut News: रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
Sanjay Raut News: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीत भाजपाकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करत नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेदेखील उपस्थित होते. याच ठिकाणी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. आमच्यासमोर नारायण राणे हेच उमेदवार हवे होते, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपाचे आभार मानले आणि खोचक टोला लगावला.
सांगलीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यासंदर्भात खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
भाजपाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे
संजय राऊत म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे. कोकणात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात. नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, आम्हाला त्या मतदारसंघात आमच्यासमोर तेच हवे होते. भाजपाने आमची विनंती मान्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, आमच्या सर्वच कार्यकत्यांमध्ये उत्साह आहे. खूप वर्षांनी भाजपाला ही जागा मिळाली आहे. मला खात्री आहे की, इथे कमळ फुलेल. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण भारतात एक लाट आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा एनडीएच्या निवडून येतील. संकल्प पत्र पूर्ण करण्याचा संकल्प भाजपाने केलेला आहे. आम्ही मागचे दोन संकल्प ९९ टक्के पूर्ण केलेत. मोठे निर्णय पंतप्रधान मोदी तिसऱ्या टर्ममध्ये घेतील. तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला देश पुढे येईल. विनायक राऊतांचा पराभव होईल. नारायण राणे अडीच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.