“दोन महिन्यांत आमची सत्ता येणार, मग नारायण राणे तिहारमध्ये असतील”; संजय राऊतांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:13 PM2024-04-05T12:13:24+5:302024-04-05T12:13:36+5:30
Sanjay Raut News: महापालिकेत पैसे खाल्ले म्हणून लवकरच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील, असा मोठा दावा नारायण राणेंनी केला होता.
Sanjay Raut News: आम्ही आमच्या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांचा प्रचार करायला आलो आहोत. विशाल पाटील संसदेत कसे जातील ते आम्ही पाहू. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आम्ही काम करतो आहोत. आघाडी धर्म आम्ही सगळेच पाळतो आहोत. काँग्रेसही पाळते आहे. आम्हीही पाळतो आहोत. आता कामाला लागले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात महानगरपालिकेने पैसे दिले. पण त्यातही यांनी पैसे खाल्ले. बाप-बेटे लवकरच तुरुंगात जाणार, अशी टीका भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली. तसेच यांचीच यंत्रणा असते असे नाही. राणे यंत्रणाही कार्यरत असते. सीआयडी, ईडी वेगळे आहेत, माझी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. अनेक जण कुठे जातात, कुठे फुटतात, कुठे उतरतात, फार बारकाईने माहिती असते, असे नारायण राणे म्हणाले.
मग नारायण राणे तिहारमध्ये असतील
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार, या नारायण राणे यांच्या दाव्यावर संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, दोन महिन्यांनी देशात आमची सत्ता येणार आहे. त्यामुळे दोन महिन्यांनी ते कुठे असतील, ईडी आणि सीबीआयच्या त्यांच्या ज्या फाइल्स बंद केल्या आहेत, त्या पुन्हा उघडल्या तर ते कुठे असतील, ते तिहार जेलमध्ये जातील, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, रामटेकमध्ये आमचा उमेदवार होता तिथे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काही बोललो का? काँग्रेसच्या नेत्यांना सांगलीत भेटणार आहोतच. विश्वजीत कदम, विशाल पाटील आमचेच आहेत. आघाडीत प्रत्येक पक्षाला वाटते की हा मतदारसंघ आपल्याकडे रहावा. मात्र आघाडीत जागा इकडे तिकडे होत असतात. भाजपाशी युती असतानाही असे झाले होते. इथे तीन पक्ष आहेत. विशाल पाटील आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील यापुढे संसदेत कसे जातील याची काळजी शिवसेना घेईल, असे संजय राऊतांनी सांगितले.