“KCR यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा”; राऊतांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:15 PM2023-06-28T12:15:45+5:302023-06-28T12:17:09+5:30

Sanjay Raut Vs BJP: भाजपमध्ये बी टीम तयार करण्याचे एक स्वतंत्र कक्ष आहे. महाविकास आघाडी प्रत्येक लढाईसाठी समर्थ आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

thackeray group sanjay raut replied chandrashekhar bawankule over criticism on maha vikas aghadi | “KCR यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा”; राऊतांनी सुनावले

“KCR यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा”; राऊतांनी सुनावले

googlenewsNext

Sanjay Raut Vs BJP: भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीकोनातून के. चंद्रशेखर राव यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांनी तुळजाभवानीचेही दर्शन घेतले. यावरून राज्यातील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

केसीआर यांना मतविभाजनासाठी भाजपने महाराष्ट्रात बोलावल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीला केसीआर यांची भीती असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. केसीआर यांचे नावही आम्हाला माहिती नाही. मग आमची बी टीम कशी असेल? मविआलाच केसीआर यांची भीती आहे. म्हणून ते केसीआर यांना आमची बी टीम म्हणत आहेत. मविआला जेव्हा पराभवाची भीती असते, तेव्हा ते असा आरोप करतात, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. 

KCR यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा

संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळेंना इतके महत्त्व देण्याची गरज नाही. चंद्रशेखर बावनकुळे स्वत:च भाजपाची ‘सी टीम’ आहेत. त्यांच्या हातात काहीही नाही. सगळे काही दिल्लीहून ठरते. महाराष्ट्रात आता भाजपची धुरा ना देवेंद्र फडणवीसांकडे आहे ना बावनकुळेंकडे. सगळे दिल्लीच्या आदेशांवर चालते. के चंद्रशेखर राव यांची वकिली बावनकुळे कधीपासून करायला लागले? तुमच्या पक्षाकडे बघा, या शब्दांत संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच मी फक्त एवढेच म्हटले की भाजपने महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी किती बी टीम, सी टीम बनवून ठेवल्या आहेत. आता ही नवीन टीम बनवली आहे. २०१९ला त्यांनी एमआयएमला बी टीम बनवले होते. कधी आणखी कुणाला करतात. नंतर काम झाले, की रात गई, बात गई, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, आता त्यांनी केसीआर साहेबांना बोलवले आहे. पण महाविकास आघाडी प्रत्येक लढाईसाठी समर्थ आहे, आम्ही लढाई लढू आणि जिंकू. भाजपत बी टीम तयार करण्याचे एक स्वतंत्र कक्ष आहे. कधी ते मनसेला वापरतात, कधी एमआयएमला वापरतात, कधी केसीआर यांना बोलवतात. हे त्यांचं धोरण आहे. पण २०२४ ला त्यांनी असे कितीही प्रयोग केले तरी मविआ मजबुतीने सगळ्यांशी लढा देईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. 


 

Web Title: thackeray group sanjay raut replied chandrashekhar bawankule over criticism on maha vikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.