“किती खोटे बोलणार, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसला”; आंबेडकरांचा आरोप, राऊतांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:50 PM2024-03-29T12:50:30+5:302024-03-29T12:54:27+5:30

Sanjay Raut Vs Prakash Ambedkar News: प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत त्याच्याशी काहीच संबंध नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

thackeray group sanjay raut replied prakash ambedkar allegations | “किती खोटे बोलणार, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसला”; आंबेडकरांचा आरोप, राऊतांचा पलटवार

“किती खोटे बोलणार, मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसला”; आंबेडकरांचा आरोप, राऊतांचा पलटवार

Sanjay Raut Vs Prakash Ambedkar News:महाविकास आघाडीतील चर्चा बिनसल्याने अखेर वंचित बहुजन आघाडीने आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तसेच महाविकास आघाडीतील जागावाटप आणि बैठका यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर घाणाघाती आरोप केले. या आरोपांना संजय राऊत यांनी उत्तर दिले.

संजय राऊत तुम्ही किती खोटे बोलणार? जर तुमची आणि आमची विचारधारा जुळत असेल, विचार पटत असतील, तर का आम्हाला बैठकीला बोलावत नाही? ६ मार्च रोजी फोर सीझन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला आमंत्रित का केले नाही? वंचितला आमंत्रित न करता बैठक करत आहात, आमच्याशिवाय बैठक का करताय? तुम्ही तर मित्राच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत तुम्ही काय भूमिका घेतली होती, ते आम्हाला माहिती आहे. अकोल्यात आमच्याविरोधात उमेदवार उभा करण्याबाबत तुम्ही मुद्दा उपस्थित केला होता हे खरे नाही का? एका बाजूला आघाडी बनवत असल्याचे चित्र निर्माण करताय आणि दुसऱ्या बाजूला आम्हालाच पाडण्याचा कट रचता, हेच तुमचे विचार का? या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांचे नाव घेऊन टीका केली होती. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उत्तर दिले.

प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घ्यायचा आहे

प्रकाश आंबेडकर कालपर्यंत नाना पटोलेंवर आरोप करत होते. आता माझ्याबद्दल बोलतायत, त्यांना आता मी काय बोलणार. प्रकाश आंबेडकर संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या बाजूने जाणार नाहीत, यावर माझा विश्वास आहे. महाविकास आघाडीने आतापर्यंत प्रत्येक बैठकीत प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाला आमंत्रित केले आहे. अनेक बैठकांनंतर वंचितच्या नेत्यांनी आणि प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः तुमच्याशी बातचीत केली आहे. प्रकाश आंबेडकरांसाठी आणखी जास्त काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, आमची लढाई संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे. प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत त्याच्याशी काहीच संबंध नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसलो. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. अनेक बैठका केल्या, या बैठकांमध्ये वंचितचे प्रतिनिधी आणि काही वेळा स्वः प्रकाश आंबेडकर उपस्थित होते, असे संजय राऊतांनी सांगितले.
 

Web Title: thackeray group sanjay raut replied prakash ambedkar allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.