Maharashtra Politics: “मोदी हेच सूर्य, चंद्र अन् धुमकेतू, माझा श्वासही मोदींमुळेच”; संजय राऊतांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:33 PM2023-04-04T12:33:50+5:302023-04-04T12:35:00+5:30
Maharashtra News: पंतप्रधान मोदी एकीकडे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचारींना कवचकुंडले प्रदान करतात, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींच्या डिग्रीच्या मुद्द्यावरूनही संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. यातच आता या देशात जो प्रकाश पडलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच. मोदी हेच सूर्य, मोदी हेच चंद्र, धुमकेतूही मोदीच आहेत. शीतल चांदणे मोदींमुळेच पडते. नद्यांचे वाहणे, समुद्राचा खळखळाटही मोदींमुळेच होतो, माझा श्वास चालतो, तोदेखील मोदींमुळेच, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, इथे सगळेच मोदी करतात, मग भ्रष्टाचाराला या देशात संरक्षण का दिले जातेय? गैरव्यवहार करणाऱ्यांना भाजपची कवचकुंडले का आहेत, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. तसेच गौतम अदानी, नीरव मोदी, विजय माल्या, किरीट सोमय्या यांना कोण संरक्षण देते. याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले आहे.
अद्याप काहीही कारवाई झालेली नाही
राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील तीन भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात याआधीही पत्र लिहिले होते. पुरावे दिले होते. आतादेखील एक पत्र लिहिले आहे. भाजप आमदार राहुल कुल, किरीट सोमय्या आणि मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत. मात्र त्यांच्यावर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. पंतप्रधान मोदी एकीकडे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात तर दुसरीकडे भ्रष्टाचारींना कवचकुंडले प्रदान करतात, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
दरम्यान, ठाण्यातील कासारवडवली येथे झालेली मारहाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच आदेशाने झाल्याचा मोठा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. ठाण्यातल्या बाजारबुणग्यांना आवरा. मनगटात रक्त असेल तर तिथे कारवाई करा. ठाण्यात एका महिलेवर १०० महिला येऊन हल्ला करतात. पोलीस आयुक्तांनी बांगड्या भरल्यात का? मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच हे होत आहे. महाराष्ट्रात आम्ही त्यांना पुरून उरलो आहोत. पोलीस यंत्रणा त्यांची गुलाम आहे. जे बघ्याची भूमिका घेतायत , त्यांना सांगतो, ठाण्यात आम्हालाही घुसता येते. आम्ही आलो तर ठाण्यात यांना घरात स्वतःला कोंडून घ्यावे लागेलस, असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"